DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

चाळीसगावात अवैध गुटखा रॅकेटचा पर्दाफाश

पाच आरोपी ताब्यात; ६.५७ लाखांचा गुटखा, पानमसाला व कार जप्त

चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी अवैध गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले असून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण ६ लाख ५७ हजार ७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे चाळीसगावातील अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी गोपनीय माहितीच्या आधारे विशेष पथक तयार केले. ८ जुलै २०२६ रोजी मिळालेल्या माहितीनुसार हनुमानवाडी परिसर, बलभीम व्यायामशाळेजवळ, आनंदवाडीतील जुना डिझेल गॅरेज परिसर तसेच बसस्थानकामागील लक्ष्मीनगर भागात काही जण प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याची अवैधरित्या वाहतूक व विक्रीसाठी साठवणूक करीत असल्याचे समोर आले.
यानुसार पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने सापळा रचून अजित चांदूमल रावलानी, कुबेर शेख कसम, हितेश किशोर पवार, निखिल राजेंद्र केसरवाणी आणि सौरभ संजय शिंगणे (सर्व रा. चाळीसगाव) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील ट्रॅव्हल बॅगची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू आढळून आला.
यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करून पंचनामा करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३३/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २४७, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम २६(२)(i), २६(२)(iv) आदी कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या कारवाईत प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली टाटा इंडिका (क्र. एमएच-१८-डब्ल्यू-७८३७) असा एकूण ६ लाख ५७ हजार ७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात हा प्रतिबंधित माल मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून चाळीसगावात तस्करी करून आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून या रॅकेटमधील इतर संबंधितांचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस करीत आहेत.
दरम्यान, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला व तत्सम तंबाखूजन्य पदार्थांची खरेदी, विक्री, साठवणूक किंवा वाहतूक करणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा अवैध व्यवसायांची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले तसेच पोलीस कर्मचारी मोहन सूर्यवंशी, अशोक मोरे आणि कल्पेश पगारे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.