DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

‘नशामुक्त भारत’ मोहिमेला मोठे यश; जळगावात ३.०६ लाखांचा मेफेड्रोन जप्त

जळगाव : जळगाव शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध विक्री व वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि जिल्हापेठ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी पहाटे धडक कारवाई करत ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, एक आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी एकूण ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सातत्याने कारवाई सुरू आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी आपल्या पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे प्रभावी कारवाया करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
दरम्यान, शुक्रवार (दि. १०) रोजी पहाटे २.३५ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागील शासकीय तांत्रिक विद्यालयाशेजारी असलेल्या जी.एस. ग्राऊंडच्या प्रवेशद्वाराजवळ काही इसम मेफेड्रोनची तस्करी करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हापेठ पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचला.
यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या तिघांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यापैकी एकाने अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. उर्वरित दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन हा अंमली पदार्थ आढळून आला. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने प्राथमिक तपासणी करून सदर पदार्थ मेफेड्रोन असल्याचे निष्पन्न केले.
पोलिसांनी आरोपींकडून २ लाख ८१ हजार ५४० रुपये किमतीचा मेफेड्रोन तसेच २५ हजार रुपये किमतीची हिरो स्लेंडर (एमएच-१९-डीजे-०१३२) मोटारसायकल असा एकूण ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी जयेश देविदास तायडे (वय २७, रा. हरी ओम नगर, मोहन टॉकीजजवळ, जळगाव) व हितेंद्र शिवाजी परदेशी (वय ३१, रा. कांचन नगर, जळगाव) यांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत त्यांनी फरार आरोपी भैय्या सोनवणे (रा. कांचन नगर, जळगाव) याच्याकडून विक्रीसाठी मेफेड्रोन घेतल्याची कबुली दिली असून, त्याचा शोध स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या जयेश तायडे याच्याविरुद्ध यापूर्वी खूनाचा प्रयत्न, शासकीय कर्मचाऱ्याला अडथळा, गंभीर दुखापत तसेच दरोड्याचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ०२१७/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा, १९८५ मधील कलम ८(क), २२(क) व २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हापेठ पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.