समांतर रस्त्यांच्या कामातील अडथळे दूर करा; महावितरणला महापौरांचे पत्र
जळगाव, प्रतिनिधी : जळगाव शहरात विकसित करण्यात येत असलेल्या समांतर रस्त्यांच्या कामात अडथळा ठरणारी विद्युत रोहित्रे, विद्युत खांब व वाहिन्या तातडीने स्थलांतरित कराव्यात, अशी मागणी महापौर दिपमाला मनोज काळे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता यांना पत्राद्वारे केली आहे.
महापौरांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, जळगाव शहराच्या मध्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना शहरवासीयांच्या वाहतुकीची सुविधा लक्षात घेऊन महानगरपालिका हद्दीतील विविध ठिकाणी समांतर रस्ते विकसित करण्याचे काम सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी महावितरणची विद्युत रोहित्रे, खांब व विद्युत वाहिन्या या कामात अडथळा ठरत असल्याने रस्ते विकासाच्या कामाला विलंब होत आहे.

यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जळगाव महानगरपालिका प्रशासनाशी समन्वय साधून नियोजित समांतर रस्त्यांच्या मार्गातील अडथळा ठरणारी विद्युत रोहित्रे, खांब व वाहिन्या तातडीने स्थलांतरित कराव्यात. तसेच, अनावश्यक ठिकाणी असलेली रोहित्रे व विद्युत संरचना निष्कासित करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी महापौरांनी पत्राद्वारे केली आहे.
या पत्राच्या प्रती जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच महावितरणच्या शहर विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.