DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पाचोऱ्यातील दोन सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार

जळगाव : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच समाजात दहशत निर्माण करणाऱ्या व वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध जळगाव जिल्हा पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई तीव्र केली आहे. त्याअंतर्गत पाचोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोघांवर मुंबई पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम ५६(१)(२) अन्वये हद्दपारीची कारवाई करण्यात आली.

पाचोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अजय तानाजी सोनवणे (वय २८, रा. पुनगाव, ता. पाचोरा) याच्याविरुद्ध विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्याच्यावर दोन वर्षांसाठी जळगाव, बुलढाणा, धुळे व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले.

तसेच पाचोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गणेश ऊर्फ सचिन गजेंद्र चौधरी (वय ३२) याच्यावरही गुन्हे दाखल असून, त्याच्याविरुद्ध दोन वर्षांच्या हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही कारवाया ७ सप्टेंबर रोजी पाचोरा विभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या आदेशाने करण्यात आल्या.

आगामी सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांविरुद्ध कठोर व कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.