DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

रोजगार महाकुंभ महाराष्ट्र अंतर्गत जळगाव जिल्ह्यात २३ ठिकाणी रोजगार मेळावे

जळगाव : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभर ५०० हुन अधिक ठिकाणी “रोजगार महाकुंभ महाराष्ट्र” पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.

राज्यातील युवकांना त्यांच्या परिसरात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच उद्योग व आस्थापनांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव कार्यालयामार्फत जिल्ह्यातील २३ ठिकाणी सकाळी १० वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात १० वी, १२ वी, सर्व शाखेतील पदवीधर, आयटीआय सर्व ट्रेड, बी.ई., बी.सी.ए., एम.बी.ए., BAMS, BHMS, नर्सिंग तसेच विविध पदवी पात्रता धारक उमेदवारांसाठी २ हजारांपेक्षा अधिक रिक्त पदे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. जिल्ह्यातील विविध नामांकित उद्योग, कंपन्या, रुग्णालये व शोरूम यांच्याकडून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने रिक्त पदांची माहिती प्राप्त झाली आहे.

जळगाव, भुसावळ, अमळनेर, चोपडा, चाळीसगाव, बोदवड, जामनेर, एरंडोल, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर व यावल आदी ठिकाणी हे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नोंदणी लिंक द्वारे अथवा उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करून माहिती भरावी. अधिक माहितीसाठी किंवा नोंदणीसंदर्भात अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत ०२५७-२९५९७९० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संदीप ज्ञा. गायकवाड, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.