DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम

गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा २७ सप्टेंबरला

जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी संगीत महाविद्यालयातर्फे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणारी ‘गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा’ यंदाही उत्साहात होणार आहे. स्पर्धेचे हे २९ वे वर्ष असून रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेच्या माध्यमातून विविध वयोगटांतील हौशी गायक-गायिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते. या स्पर्धेतून अनेक गायक-कलाकारांना संधी मिळाली असून यंदाही राज्यभरातून स्पर्धक सहभागी होत आहेत. नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

स्पर्धा बाल, किशोर आणि प्रौढ अशा तीन गटांत होणार आहे. बाल गटात इयत्ता पहिली ते सहावी, किशोर गटात इयत्ता सातवी ते बारावी, तर प्रौढ गटात ४० वर्षांपर्यंतचे स्पर्धक सहभागी होऊ शकतात.

प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पारितोषिक, गोदावरी करंडक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रौढ गटात प्रथम क्रमांकासाठी २,००१, द्वितीय १,५०१ व तृतीय १,००१ रुपये; किशोर गटात अनुक्रमे १,५०१, १,००१ व ७०१ रुपये, तर बाल गटात १,००१, ७०१ व ५०१ रुपये अशी पारितोषिके आहेत. याशिवाय उत्तेजनार्थ पारितोषिक व प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

स्पर्धा दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार असून त्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर केला जाणार आहे. किशोर व प्रौढ गटासाठी मराठी चित्रपटांतील भावगीते व गझल, तर बाल गटासाठी बालगीते व भावगीते सादर करता येतील.

ही स्पर्धा केवळ हौशी कलाकारांसाठी असून व्यावसायिक तसेच आकाशवाणी मान्यताप्राप्त कलाकारांना प्रवेश दिला जाणार नाही. प्रत्येक स्पर्धकाला एकच गीत सादर करता येईल व गीताचे दोनच अंतरे सादर करण्याची परवानगी असेल.

इच्छुक स्पर्धकांनी प्रवेश अर्जाची झेरॉक्स प्रत सादर करावी. अधिक माहितीसाठी गोदावरी संगीत महाविद्यालय, गोदावरी हॉस्पिटल, भास्कर मार्केटजवळ, जळगाव येथे संपर्क साधावा. संपर्क : ९८५०० ७५६५१, ९९२१९९ ६९७४.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.