DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा १२ तासांत उघडकीस

शनीपेठ पोलिसांची कारवाई; १२ हजार ६५० रुपये रोख रकमेसह दोन संशयित ताब्यात

जळगाव : शहरातील योगेश्वरनगर परिसरातील गजानन पार्क येथील नर्मदेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी चोरीचा गुन्हा शनीपेठ पोलिसांनी अवघ्या १२ तासांत उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून चोरीची १२ हजार ६५० रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली आहे.

दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी नर्मदेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी फिर्यादी योगेश्वर देविदास पाटील यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांना तपास करून आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच पोलिसांची गोपनीय यंत्रणा सक्रिय करण्यात आली.

तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी चंद्रकांत भागवत पाटील (रा. दशरथनगर, जळगाव) तसेच एका विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले. चौकशीत संशयितांनी गजानन पार्क येथील नर्मदेश्वर महादेव मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या ताब्यातून चोरीची १२ हजार ६५० रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अनिल सांबुळे, शनीपेठ पोलीस ठाणे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव विभाग जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. तपास पथकात पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सहभाग होता.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.