DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

स्व. अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे जळगाव जिल्हा बँकेत लवकरच अनावरण

देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्राताई पवार यांच्यासह इतर मान्यवरांना निमंत्रण

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परिसरात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लवकरच अनावरण करण्यात येणार आहे. या अनावरण सोहळ्याच्या आयोजनाची तयारी सुरू झाली असून, राज्यातील विविध मान्यवरांना निमंत्रण देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध मान्यवरांच्या भेटी घेऊन अनावरण सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले या वेळी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय मुरलीधर पवार, बँकेचे व्हाईस चेअरमन तथा आमदार अमोलदादा पाटील, आमदार चंद्रकांत पाटील आणि बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना अनावरण सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले.

१२ ते १४ ऑक्टोबरदरम्यान कार्यक्रमाचे नियोजन

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम दि. १२, १३ व १४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील, केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडामंत्री रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री पंकज भोयर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनीलजी तटकरे यांनाही पत्राद्वारे निमंत्रण देण्यात आले आहे.

सहकार क्षेत्रातील योगदानाची स्मृती जपणारा पुतळा

स्वर्गीय अजितदादा पवार यांनी सार्वजनिक जीवनात तसेच सहकार क्षेत्रात केलेल्या कार्याची आणि योगदानाची स्मृती जपणारा हा पूर्णाकृती पुतळा ठरणार आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला राज्यातील विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. अनावरण सोहळा भव्य स्वरूपात आयोजित करण्याच्या दृष्टीने बँक प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात येत असून, कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध स्तरांवर तयारीला वेग देण्यात आला आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.