कौशल्य आणि ज्ञानाचा समतोल राखणे आवश्यक : जिल्हाधिकारी रोहन घुगे
जळगाव : सध्याची औद्योगिक परिस्थिती वेगाने बदलत आहे. त्यामुळे केवळ पदवी किंवा शैक्षणिक ज्ञानावर अवलंबून न राहता त्याला प्रत्यक्ष कौशल्याची जोड देणे आवश्यक आहे. मोठ्या शहरांकडे नोकरीसाठी स्थलांतर करण्यापेक्षा स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या कंपन्यांमध्ये कामाची सुरुवात करून अनुभव मिळविणे अधिक फायदेशीर ठरू शकते, असे मत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच उद्योग व आस्थापनांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.
मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. याच अनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, केतकीताई पाटील फाउंडेशन आणि गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सुशिक्षित उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन भुसावळ रोडवरील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी घुगे युवकांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
अभियानांतर्गत जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात किमान एक, तसेच उर्वरीत मेळावे शहरात अशा एकूण २४ रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. टायटन लॅबोरेटरीज, मार्कस फार्मा, डीपीसी फिनिशिंग यांसह विविध नामवंत कंपन्यांमध्ये १ हजार ६०० पेक्षा अधिक पदांसाठी थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी घुगे यांनी केले.
सर्टिफिकेटपेक्षा कौशल्याचा प्रत्यक्ष वापर महत्त्वाचा : श्रीकांत धिवरे
केवळ पदव्या आणि सर्टिफिकेट मिळवून आजच्या स्पर्धात्मक युगात यश मिळत नाही. प्रत्यक्ष उपयोगात येणारे कौशल्य आणि मिळविलेल्या ज्ञानाचा योग्य वापर यामुळेच युवकांना यशाच्या दिशेने वाटचाल करता येते. वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आणि सामाजिक वातावरणाच्या काळात तरुणांनी स्वतःला सातत्याने अपडेट ठेवणे आवश्यक आहे, असे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी सांगितले.
‘नॉलेज इज पॉवर’ या पारंपरिक संकल्पनेपेक्षा आता ‘ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज इज पॉवर’ अर्थात ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर ही काळाची गरज बनली आहे. कोणतेही कौशल्य एका रात्रीत आत्मसात होत नाही. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, सराव आणि योग्य मानसिकता आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी सहाय्यक आयुक्त संदीप गायकवाड, विशेष कार्य अधिकारी मनोज महाजन, प्राचार्य विजयकुमार पाटील यांच्यासह रोजगारक्षम युवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त संदीप गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन रेष्मा अतरडे हीने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉ. विजय वानखडे यांच्यासह महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
