DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

जळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि ‘चरखा जयंती’ तसेच ‘जागतिक अहिंसा दिनानिमित्त’ गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ‘अहिंसा सद्भावना शांती यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार, २ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता लालबहादूर शास्त्री टॉवर चौकातून या यात्रेला सुरुवात होणार आहे. नियोजीत सद्भावना शांती यात्रा लालबहादूर शास्त्री टॉवर चौक येथून सुरू होऊन पं. नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. हेडगेवार चौक, नवीन बस स्थानक मार्गे महात्मा गांधी उद्यानापर्यंत येऊन सभेत रुपांतरीत होईल. नागरिकांनी या शांती यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले.

यासाठी ग्रामीण विकास व पंचायती राज, पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खा. स्मिता वाघ, खा. उज्वल निकम, आ. सुरेश भोळे, कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्हि. एल. माहेश्वरी, जिल्हाधिकारी रोहन घुगे, महापौर दीपमाला काळे, माजी खा. डॉ. उल्हास पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त आदित्य जिवने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, भरत अमळकर यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रीत करण्यात आलेले असून प्रमुख अतिथी म्हणून ते सहभागी होणार आहेत.

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांचा जागर करण्यासोबतच आजच्या समाजात अहिंसा, परस्पर सद्भावना आणि शांततामय सहजीवनाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न या यात्रेतून केला जाणार आहे. ‘भारत की संतान’ हा विशेष कार्यक्रम देखील सादर करण्यात येणार आहे. यात भारतातील विविध राज्यांच्या वैविध्यपूर्ण, समृद्ध आणि चैतन्यमय संस्कृतीचे मनोहारी सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सभेत उपस्थितांना अहिंसा प्रतिज्ञा दिली जाणार आहे. याच कार्यक्रमात गांधीतीर्थद्वारा घेतल्या गेलेल्या देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्याहस्ते पारितोषिके प्रदान करण्यात येतील.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.