रस्ते अपघातातील तरुणाच्या मेंदूवरील गंभीर दुखापतीवर यशस्वी शस्त्रक्रिया
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांचे यश; महात्मा फुले योजनेंतर्गत उपचार
जळगाव : खरगाव येथील लंगडाअंबा परिसरातील २४ वर्षीय तरुणाच्या अपघातामुळे झालेल्या मेंदूच्या गंभीर दुखापतीवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली. गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झालेल्या तरुणावर वेळ न दवडता तातडीने उपचार करण्यात आल्याने त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
लंगडाअंबा परिसरातील दयाराम बरेला (२४) यांचा रस्ते अपघात झाला होता. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात आणण्यात आले त्यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत होते. मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी तातडीने तपासणी करून उपचार सुरू केले.

रुग्णाची एनसीसीटी ब्रेन तपासणी करण्यात आली. या तपासणीत डोक्याच्या डाव्या कपाळाच्या भागात डिप्रेस्ड स्कल फ्रॅक्चर म्हणजे कवटीचे हाड तुटून आतल्या बाजूला दाबले गेल्याचे आढळून आले. तसेच फ्रॅक्चरच्या खालील भागात मेंदूच्या ऊतींना दुखापत झाल्याचे म्हणजेच कंट्युजन असल्याचे निदान झाले. रुग्ण बेशुद्ध असल्याने आणि मेंदूला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्ट झाल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
रुग्णाच्या मेंदूवरील वाढलेला दाब कमी करण्यासाठी तसेच साचलेले रक्त बाहेर काढण्यासाठी त्याच दिवशी ‘डीकम्प्रेसिव्ह क्रेनिएक्टॉमी विथ इव्हॅक्युएशन ऑफ हेमॅटोमा’ ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. उपचारांना त्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून पोस्ट-ऑपरेटिव्ह काळात कोणतीही मोठी गुंतागुंत झाली नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
ही शस्त्रक्रिया डॉ. विपूल राठोड यांनी केली. त्यांना डॉ. प्रितम दास व त्यांच्या टीमने सहकार्य केले. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत करण्यात आली.
“रस्ते अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर रुग्णाला शक्य तितक्या लवकर तज्ज्ञ वैद्यकीय उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. बेशुद्धावस्था, डोक्याला गंभीर मार, उलट्या, झटके किंवा प्रतिसाद न देणे अशी लक्षणे दिसल्यास विलंब न करता रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करावे. दयाराम बरेला यांच्या प्रकरणात वेळेत रुग्णालयात दाखल करून आवश्यक तपासण्या व तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाली आहे.”
— डॉ. प्रितम दास, डॉ. उल्हास पाटील रुग्णालय