वाघूर धरणातील पाणी जळगाव शहरासाठी राखीव ठेवा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महापालिका आयुक्तांकडे मागणी; आगामी महासभेतील प्रस्तावाला विरोध
जळगाव : वाघूर धरणातील पाणी जळगाव शहराच्या वापरासाठी राखीव ठेवावे आणि हे पाणी अन्यत्र वळविण्याचा निर्णय घेऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जळगाव महानगरपालिका आयुक्तांकडे करण्यात आली. आगामी ९ तारखेला होणाऱ्या महासभेत वाघूर धरणातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह इतर ठिकाणी पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याची माहिती असून, या प्रस्तावाला पक्षाने विरोध दर्शविला आहे. जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली यासंदर्भात भूमिका मांडण्यात आली.
जळगाव शहराचा वाढता विस्तार, नागरिकांना सध्या दोन दिवसांआड होणारा पाणीपुरवठा आणि आगामी काळातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शहराच्या पाण्याचे नियोजन प्राधान्याने करणे आवश्यक असल्याचे लाडवंजारी यांनी सांगितले. एल निनोच्या संभाव्य परिणामांमुळे दुष्काळाचे संकट निर्माण होण्याची शक्यता विविध तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत असल्याने उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

जळगाव शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले असताना, शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि भविष्यातील पाण्याच्या गरजेचा विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे. वाघूर धरणातील पाणी शहरासाठी पुरेसे राहील, याची खात्री केल्यानंतरच अन्य प्रकल्पांना पाणी देण्याबाबत विचार करावा, अशी भूमिका पक्षाने मांडली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि क्रीडा संकुल यांसारखे मोठे प्रकल्प उभारताना पाण्याची उपलब्धता आणि आवश्यक पायाभूत सुविधांचे नियोजन आधीच करणे गरजेचे होते. मात्र, प्रकल्प उभारल्यानंतर पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न होत असल्यास तो नियोजनातील त्रुटींचा विषय ठरतो, असे लाडवंजारी यांनी नमूद केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक पाण्याची व्यवस्था कशी करण्यात आली, तसेच बांधकामादरम्यान काँक्रीटच्या क्युरिंगसाठी पाणी कसे उपलब्ध झाले, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. इमारतीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त करत या संपूर्ण इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. या शंका तपासून वस्तुस्थिती स्पष्ट करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
महानगरपालिकेच्या आगामी महासभेत सर्व नगरसेवकांनी जळगावकरांच्या हिताचा विचार करून निर्णय घ्यावा. भविष्यात शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी वाघूर धरणातील पाणी शहरासाठी राखीव ठेवण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन लाडवंजारी यांनी केले. शहराच्या हक्काच्या पाण्याबाबत कोणताही निर्णय घेताना नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विचार होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी महानगरपालिका आयुक्तांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. उपस्थितांनी मांडलेल्या काही मुद्द्यांवर आयुक्तांनी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याचे लाडवंजारी यांनी नमूद केले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी व राजू मोरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मंगलाताई पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहरभाई पठाण, जिल्हा कार्यालय सरचिटणीस सुनील माळी, जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत, महानगर युवक जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, महानगर चिटणीस नईम खाटिक, जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाटील, ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव वाघ, युवक जिल्हा उपाध्यक्ष गणेश हटकर, कार्यालयमंत्री सतीश चव्हाण यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.