DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेश विजेता

नॉर्थ इंडिया उपविजेता; महाराष्ट्राला तृतीय क्रमांक ; अनुभूती निवासी स्कूलमध्ये स्पर्धेचे देखणे आयोजन

जळगाव : अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूल येथे आयोजित सातव्या सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट चॅम्पियनशिप-२०२६ स्पर्धेत उत्तर प्रदेश संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात उत्तर प्रदेशने नॉर्थ इंडिया संघाचा आठ धावांनी पराभव केला. नॉर्थ इंडिया संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तृतीय क्रमांकाच्या सामन्यात महाराष्ट्राने तामिळनाडू, पुद्दुचेरी व अंदमान-निकोबारचा समावेश असलेल्या संघाचा पराभव करून तृतीय क्रमांक मिळविला.
देशभरातील १५ प्रादेशिक संघांनी या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला. अनुभूती निवासी स्कूलचे क्रीडांगण, जैन ड्रीम स्पेस-मेहरूण तलावाजवळील मैदान तसेच एमके स्पोर्ट्स, सावखेडा येथील मैदानांवर स्पर्धेतील सामने रंगले.

उत्तर प्रदेशचा आठ धावांनी विजय
अंतिम सामन्यात उत्तर प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ६ बाद १४८ धावा केल्या. रबिंशने ४२, अकबर अन्सारीने ३६ तर कर्तव्य जैनने २२ धावांचे योगदान दिले. नॉर्थ इंडियाकडून अबिरने तीन, तर प्रारब्ध सेठी व रेहांत कशब यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
विजयासाठी १४८ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या नॉर्थ इंडिया संघाला १९.५ षटकांत १४० धावांवरच समाधान मानावे लागले. यष्टीरक्षक फलंदाज समर्थने ३२, तर परनित सिद्धूने १७ धावा केल्या. उत्तर प्रदेशकडून अविरलने तीन महत्त्वाचे बळी घेतले. अनिमेश यादवने दोन, तर सात्विक, यश, श्लोक व मोहम्मद फैज यांनी प्रत्येकी एक बळी घेत उत्तर प्रदेशच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
उत्तर प्रदेश संघाचे प्रशिक्षक श्री मनोज व कर्णधार अविरल यांनी प्रतिक्रिया देताना अनुभूती स्कूल चे आयोजन हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ठरले, क्रीडांगणांसह सर्व व्यवस्थेसह मुख्य म्हणजे सामन्यातील उत्कृष्ट पंचगिरी याचे कौतूक केले. पुढील वर्षीसुद्धा याठिकाणी खेळण्यास येण्यास आनंद वाटेल असेही त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्राचा तृतीय क्रमांक
तृतीय क्रमांकाच्या सामन्यात तामिळनाडू, पुद्दुचेरी व अंदमान-निकोबारच्या संयुक्त संघाने निर्धारित १५ षटकांत ६ बाद ९९ धावा केल्या. महाराष्ट्राने हे आव्हान १४.३ षटकांत चार फलंदाजांच्या योगदानावर सहज पार केले. सार्थक शिंदे व आदित्य गुरुदासणी यांनी प्रत्येकी २५, युग सोनिग्राने २४ तर कर्णधार रणवीर गुंड पाटीलने २१ धावा केल्या. महाराष्ट्राकडून अन्मय अतुल जैन व रणवीर गुंड पाटील यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. पलाश व तनिश जैन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

उत्कृष्ट खेळाडूंना विशेष पुरस्कार
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विशेष पुरस्कार देण्यात आले. उत्तर प्रदेशच्या अविरलने पाच सामन्यांत नऊ बळी घेत सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार मिळविला. महाराष्ट्राच्या आदित्य गुरदासणीने पाच सामन्यांत १६५ धावा करत सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार पटकावला. नॉर्थ इंडियाच्या प्रारब्ध सेठीने पाच डावांत १०४ धावा करण्याबरोबरच नऊ बळी घेतल्याबद्दल स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळविला.

मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण
पारितोषिक वितरण समारंभास अनुभूती निवासी स्कूलचे प्राचार्य देबाशिष दास, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे, जैन स्पोर्टस अकॅडमीचे समन्वयक रविंद्र धर्माधिकारी, अनुभूती स्कूलचे विक्रांत जाधव, भिकन खंबायत आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेता, उपविजेता व तृतीय क्रमांकाच्या संघांना पदके, चषक व पुरस्कार प्रदान करण्यात आले. ही पारितोषिके जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडतर्फे प्रायोजित करण्यात आली होती.
समारोपप्रसंगी सीआयएससीईचे अधिकारी, पंच, प्रशिक्षक, व्यवस्थापक, खेळाडू, अनुभूती स्कूलच्या क्रीडा विभागातील शिक्षक व कर्मचारी, स्वयंसेवक तसेच मैदान कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.