गोदावरी कॉलेजजवळ कोयता, तलवारीने प्राणघातक हल्ला; तिघांना १२ तासांत अटक
उधारीवर पान-सिगारेट न दिल्याच्या कारणावरून तरुणांची दहशत; खेडी येथील तिघे पोलिसांच्या ताब्यात, एक विधिसंघर्षित बालकही गुन्ह्यात सहभागी
जळगाव : उधारीवर पान आणि सिगारेट दिले नाही म्हणून दुकानदाराला शिवीगाळ करत कोयता व तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना जळगाव शहरातील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ घडली. या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली. या गुन्ह्यात एका विधिसंघर्षित बालकाचाही सहभाग असल्याचे पोलिसांनी दिलेल्या माहितीत नमूद केले आहे.
ही घटना २३ ऑक्टोबर रोजी सकाळी आठच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. किशोर माधवराव बाविस्कर (वय ४१, रा. शिवनगर, खेडी बुद्रुक) हे भंगार व्यवसायासह पानटपरी चालवतात. उधारीवर पान-सिगारेट दिले नाही, या कारणावरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. तसेच दोन्ही भावांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानंतर आरोपींनी किशोर बाविस्कर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी आनंद पाटील याने कोयत्याने, तर हर्षल शिंदे याने तलवारीने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी बाविस्कर यांच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच पोलिसांची शोधमोहीम
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१), ३५१(२), ३५२, ३(५) तसेच शस्त्र अधिनियमाच्या कलम ४/२५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आरोपींबाबत माहिती संकलित केली. गोपनीय माहितीच्या आधारे आनंद हरी पाटील (वय २४), हर्षल रविंद्र शिंदे (वय २०) आणि गौरव विनोद पाटील (वय २०), तिघेही रा. खेडी, ता. जळगाव, यांना गुन्ह्याच्या तपासासाठी अटक करण्यात आली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, संजीव मोरे, पोलीस नाईक प्रदीप चौधरी तसेच नितीन ठाकूर, गणेश ठाकरे, किरण पाटील, राहुल घेटे, शशिकांत मराठे, रमाकांत साळुंखे, सुभाष साबळे आणि राहुल पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करीत आहेत.