गोदावरी अभियांत्रिकीच्या भूषण घुलें यांची एचएएल बेंगळुरू येथे निवड!
कनिष्ठ कार्यकारी अभियंता पदावर मिळवली संधी,ऑटोकॅड आणि क्रेओ मधील कौशल्याचा करिअरला फायदा
जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचालित गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी भूषण शांताराम घुले याची देशातील प्रतिष्ठित विमाननिर्मिती व संरक्षण क्षेत्रातील संस्था हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), बेंगळुरू येथे कनिष्ठ कार्यकारी अभियंता (ज्युनिअर एक्झीकेटीव्ह इंजि) पदावर निवड झाली आहे.
भूषण याने महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अभ्यासासोबतच तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्यांच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले. त्याने ऑटोकॅड आणि क्रेओ या संगणकाधारित अभियांत्रिकी डिझाइन सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण पूर्ण केले. या माध्यमातून कॅड आधारित डिझाइन क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्य आत्मसात केले. शैक्षणिक ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यामुळे त्याच्या व्यावसायिक जडणघडणीला दिशा मिळाली. याच कौशल्यांचा त्याला निवड प्रक्रियेत फायदा झाला.या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या हस्ते भूषण घुले याचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. विजयकुमार वानखेडे (प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी), डॉ. तुषार कोळी (अधिष्ठाता व मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागप्रमुख), डॉ. किशोर महाजन (अधिष्ठाता, आयपीआर), डॉ. पंकज बोंडे आणि प्रा. भालचंद्र सुरवाडे (टी अँन्ड पी समन्वयक) उपस्थित होते. यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी भूषणचे अभिनंदन केले.गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणासोबतच उद्योगाभिमुख प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान, कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर सातत्याने भर दिला जातो. भूषण घुले याची एचएएल सारख्या प्रतिष्ठित संस्थेत झालेली निवड ही महाविद्यालयाच्या या प्रयत्नांना मिळालेली यशस्वी पावती असून इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.