जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल; चार अधिकाऱ्यांच्या बदल्या, नव्या नियुक्त्या
आर्थिक गुन्हे शाखा, AHTU, शनीपेठ आणि बोदवड पोलीस ठाण्यांच्या प्रभारी पदांमध्ये बदल
जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी आदेश जारी करून चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नव्या नियुक्त्या केल्या आहेत. या फेरबदलांमुळे आर्थिक गुन्हे शाखा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU), शनीपेठ आणि बोदवड पोलीस ठाण्यांच्या प्रभारी पदांवर नवीन अधिकारी नियुक्त झाले आहेत.
पोलीस अधीक्षकांनी जारी केलेल्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक आशिष मधुकर लकांडे यांची बोदवड पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदावरून आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव येथे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलीस निरीक्षक विशाल प्रभुलाल जयस्वाल यांची शनीपेठ पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदावरून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या (AHTU) प्रभारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

याशिवाय, पोलीस निरीक्षक नितीन सुदाम पाटील यांची आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव येथून शनीपेठ पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विवेकानंद दत्तात्रय राळेभात यांची बोदवड पोलीस ठाण्याच्या दुय्यम अधिकारी पदावरून त्याच पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रशासकीय फेरबदलांमध्ये सहायक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे यांना AHTU विभागाच्या प्रभारी अधिकारी पदाच्या अतिरिक्त कार्यभारातून मुक्त करण्यात आले आहे. त्यांना मानव संसाधन विभाग, जळगाव येथे त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी पूर्णवेळ कामकाज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पोलीस उपनिरीक्षक सागर शिंपी यांनाही शनीपेठ पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदाच्या अतिरिक्त कार्यभारातून मुक्त करण्यात आले आहे.
बदली व नियुक्ती करण्यात आलेल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी हजर होऊन त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करावा, असे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.
या फेरबदलांमुळे जिल्हा पोलीस दलातील महत्त्वाच्या शाखा आणि पोलीस ठाण्यांच्या कामकाजाची जबाबदारी आता नव्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली असून, प्रशासकीय कामकाजात बदल होणार आहेत.