उष्णतेचा कहर सुरूच! 2025 मध्ये मोडणार सर्व रेकॉर्ड? नागरिकांत चिंता वाढली
नवी दिल्ली: देशातील अनेक भागांत सध्या सूर्य आग ओकत असून तापमान 40 अंशांच्या पुढे गेलं आहे. एप्रिल महिना अजून पूर्णही झाला नाही, आणि आताच उष्णतेची लाट भीषण झाली आहे. त्यामुळे यंदाचं वर्ष सर्वाधिक तापमानाचं ठरेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. 1901 नंतर 2024 हे सर्वात गरम वर्ष ठरले होते, मात्र 2025 तेही मागे टाकेल, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
उष्णतेची लाट – एप्रिल ते जूनमध्ये काय वाढून ठेवलंय?
उत्तर व पश्चिम भारतातील अनेक शहरांमध्ये तापमान झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रातही विदर्भ, मराठवाडा आणि मुंबईसह अनेक शहरांत पारा 35-40 अंशांच्या पुढे गेला आहे. उकाडा इतका असह्य झाला आहे की बाहेर पडणं टाळणं गरजेचं वाटू लागलं आहे. या दरम्यान काही भागांत अवकाळी पाऊस झाल्याने तापमानात थोडा उतार पाहायला मिळाला.
उष्माघाताचा धोका वाढतोय
बुलडाणा जिल्ह्यात उष्माघाताने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास गरजेशिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.
पाणीटंचाईची झळ – ग्रामीण भागात स्थिती गंभीर
ग्रामीण भागांमध्ये उन्हामुळे तलाव, धरणं आटत चालली आहेत. पाण्याचे स्रोत कोरडेठाक पडले असून, विहिरी, नळ आणि नद्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी शेती आणि जनावरांसाठी पाणी मिळणं कठीण झालं आहे. अनेक गावांमध्ये पाणी टँकरवर अवलंबित्व वाढलं आहे.