कोरोनाचा धोका वाढतोय; महाराष्ट्रात १३२ रुग्ण, मुंबई-पुण्यात सर्वाधिक संसर्ग
मुंबई : कोविड-१९ विषाणूचा पुन्हा एकदा धोका निर्माण झाला असून महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. हाँगकाँग आणि सिंगापूरसारख्या आशियाई देशांमध्ये प्रकरणं वाढल्यानंतर भारतातही परिस्थिती चिंतेची बनत आहे. बुधवारी राज्यात २६ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या १३२ वर पोहोचली आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ ते मेपर्यंत करोना संसर्गामुळे दोन मृत्यू झाले असून हे दोघेही मुंबईतील रहिवासी होते. त्यांच्या आधीपासूनच्या गंभीर आजारांमुळे करोनाचा फटका अधिक झाला, असे सांगण्यात आले.
राज्यातील एका सर्वेक्षणात असे आढळले आहे की करोना बाधित कुटुंबांपैकी २२% कुटुंबांमध्ये तापासारखी लक्षणं दिसून आली आहेत. या सर्वेक्षणात ७ हजारहून अधिक नागरिकांचा सहभाग होता, त्यातील ५४% मुंबई आणि पुण्यातील आहेत.
दरम्यान, जानेवारीपासून आतापर्यंत ६०६६ नमुन्यांची करोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी १०६ रुग्णांना संक्रमण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या ५२ जणांवर राज्यभरातील विविध १६ रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि ताप, खोकला, इतर आजारांची लक्षणं दिसल्यास तात्काळ चाचणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.