व्यावसायिक एलपीजी सिलिंडर २४ रुपयांनी स्वस्त; नवीन दर आजपासून लागू
नवी दिल्ली – तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात केली असून, १९ किलोच्या सिलिंडरची किंमत २४ रुपयांनी घटवण्यात आली आहे. ही नवीन दररचना आजपासून, म्हणजे १ जूनपासून लागू करण्यात आली आहे.
दिल्लीत या कपातीनंतर १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता ₹१७२३.५० इतकी झाली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
हॉटेल्स व रेस्टॉरंट्सना मोठा दिलासा
याआधी एप्रिलमध्ये सिलिंडरच्या किमतीत घट झाली होती आणि किंमत ₹१७६२ पर्यंत आली होती. फेब्रुवारीमध्ये ७ रुपयांची घट आणि मार्चमध्ये ६ रुपयांची वाढ झाली होती. अशा चढ-उतारानंतर जूनमध्ये आलेली ही कपात रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि लघुउद्योगांसाठी काहीसा दिलासादायक ठरणार आहे.
भारतामध्ये एलपीजीचा अंदाजे ९० टक्के वापर घरगुती गरजांसाठी होतो, तर उर्वरित १० टक्के एलपीजीचा वापर औद्योगिक, व्यावसायिक आणि वाहनांमध्ये केला जातो.