जळगावकरांसाठी दिलासादायक बातमी! गिरणा धरणाने गाठली पन्नाशी
जळगाव | जळगाव जिल्ह्याच्या जलजीवनाचा कणा मानले जाणारे गिरणा धरण यंदा समाधानकारक साठ्याने भरत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. गिरणा धरणाचा पाणीसाठा ५०.७६ टक्क्यांवर पोहोचला असून, यामुळे भविष्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे.
पाऊस कमी, पण साठा भरगच्च
जिल्ह्यात सध्या पावसाने पाठ फिरवली आहे. पण नाशिक जिल्ह्यात होणाऱ्या पावसामुळे गिरणामध्ये समाधानकारक आवक होत आहे. २० जूनला फक्त २० टक्क्यांवर असलेला साठा आता अवघ्या २१ दिवसांत तब्बल ३० टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी गिरणात केवळ ११.७४ टक्के पाणीसाठा होता, त्यामुळे चिंता वाढली होती. मात्र यंदा त्याच दिवशी धरणाने पन्नाशी पार करत जिल्ह्याला मोठा दिलासा दिला आहे.
ठेंगोडा, चणकापूर, हरणबारीचा हातभार
नाशिक जिल्ह्यातील ठेंगोडा धरण ओव्हरफ्लो होऊन त्यातून ८७१ क्युसेक विसर्ग करण्यात आला. त्यानंतर चणकापूर, पुनद आणि हरणबारी या धरणांतूनही मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले, ज्याचा थेट फायदा गिरणाला झाला. यामुळे गिरणा धरण सलग दुसऱ्या वर्षी १००% भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दुसरीकडे काही प्रकल्प कोरडेच
गिरणाचा साठा वाढत असला तरी जिल्ह्यातील अग्नावती, भोकरबारी व बोरी ही तीन धरणे सध्या शून्य टक्के साठ्याशी झगडत आहेत. त्यामुळे काही भागांत अजूनही पाण्याची टंचाई कायम आहे.
मान्सून कमकुवत, पिकांना धोका
जिल्ह्यात पावसाचे आगमन होऊन दीड महिना झाला असला तरी दमदार पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. कमकुवत मान्सूनमुळे तापमानातही चढ-उतार सुरू आहेत. मात्र, १३ ते १५ जुलै दरम्यान दुपारनंतर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, त्यामुळे काहीसा दिलासा मिळू शकतो.