DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

कबुतरांच्या संपर्कामुळे होणाऱ्या हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिसवर यशस्वी उपचार

जळगाव – कबुतरांच्या संपर्कामुळे हायपरसेन्सिटिव्हिटी न्युमोनायटिस गंभीर फुफ्फुसांचा आजाराने अत्यावस्थ झालेल्या ३० वर्षीय युवकावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मेडीसिन तज्ञांनी अचूक आणि सातत्यपूर्ण उपचारांमुळे प्राण वाचवले.
एक ३० वर्षीय युवक अत्यावस्थ अवस्थेत रूग्णालयात दाखल झाला. रूग्णालयात आल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांनी त्याची सविस्तर तपासणी केली. युवकाला सतत खोकला, श्वास घेण्यात त्रास, ताप, थकवा, अंगदुखी, छातीत दुखणे व दडपण यासारखी लक्षणे होती. त्याच्या छातीचा एक्स-रे, सीटी स्कॅन, पल्मोनरी फंक्शन टेस्ट, रक्त चाचणी, अॅन्टीबॉडी टेस्ट, ब्रोन्कोस्कोपी आणि लंग बायोप्सी करण्यात आली. यानंतरकबुतरांच्या संपर्कामुळे हायपरसेन्सिटिव्हिटी न्युमोनायटिस गंभीर फुफ्फुसांचा आजाराचे निदान निश्चित केले गेले. याच्यानंतर युवकाला स्वतंत्र बेडवर ठेवून २४ तास रक्तदाब आणि हृदयाचे ठोके यावर लक्ष ठेवत विविध औषधोपचार सुरू करण्यात आले. तब्बल २५ दिवसांच्या काळजीपूर्वक उपचारानंतर युवक पूर्णपणे धोक्याच्या बाहेर आला. यशस्वी उपचारासाठी डॉ. सी. डी. सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने अत्यंत दक्षतेने काम केले.

हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमोनायटिस म्हणजे काय?
हा एक अॅलर्जिक फुफ्फुसांचा आजार आहे. पक्ष्यांचे पिसे, विष्ठा किंवा सुकलेल्या पिसांमधून उडणारे सूक्ष्म प्रथिनकण वासातून शरीरात जाऊन श्वसनमार्गात अॅलर्जी निर्माण करतात. यामुळे फुफ्फुसांमध्ये सूज येते आणि श्वास घेणे कठीण होते. हा आजार पिजन ब्रीडर्स लंग किंवा बर्ड फॅन्स लंग म्हणूनही ओळखला जातो.

सावधानता आणि प्रतिबंध
पक्ष्यांशी संपर्क शक्यतो कमी करा. घरात किंवा छतावर पक्ष्यांचे घरटे तयार होऊ देऊ नका. पिसे किंवा विष्ठा साफ करताना मास्क व हातमोजे वापरा. पक्ष्यांची जागा स्वच्छ, हवेशीर आणि कोरडी ठेवा. लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉ. सी. डी. सारंग यांनी सांगितले की, हा आजार संसर्गजन्य नाही, पण योग्य खबरदारी घेतल्यास टाळता येतो. पक्ष्यांवर प्रेम ठेवताना फुफ्फुसांचे आरोग्य जपणे अत्यंत महत्वाचे आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.