ट्रेडिंगच्या नावाखाली आयोध्यानगरात दोन व्यावसायिकांना सायबर गंडा
जळगाव : आयोध्यानगर परिसरात अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोन व्यावसायिकांची जवळपास दहा लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. गॅरेज व्यावसायिक सावरमल पुरनमल जांगीड (वय ४९) यांच्याकडून ५ लाख ३५ हजार रुपये, तर फर्निचर व्यावसायिक महेश बनवारीलाल जांगीड (वय ४३) यांच्याकडून ४ लाख ६१ हजार रुपये असा एकूण ९ लाख ९६ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, दि. २९ सप्टेंबर रोजी सावरमल जांगीड यांना ‘धर्मा सेक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने आचल नामक महिलेनं फोन करून शेअर ट्रेडिंगविषयी संपर्क साधला. कंपनी सेबीमध्ये नोंदणीकृत असल्याचे सांगत गुंतवणुकीवर मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून जांगीड यांनी २२ सप्टेंबर रोजी ट्रेडिंग अॅप्लिकेशनवर एक लाख रुपये जमा केले.

यानंतर आचलने ओटीपी मागून त्यांचा मोबाईल ताब्यात घेतला आणि ट्रेडिंग सुरू करण्यास सांगितले. काही दिवसांनी नफा दाखवत आणखी रक्कम गुंतवण्यास सांगण्यात आले. जांगीड यांनी टप्प्याटप्प्याने ५ लाख ३५ हजार रुपये जमा केले. काही दिवसांनी अॅपवर सात लाख १८ हजार रुपयांचा नफा दाखवण्यात आला, मात्र ती रक्कम काढण्याचा प्रयत्न करताच व्यवहार थांबला आणि संपर्क क्रमांक बंद झाला. परिणामी त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदविली.
याच पद्धतीने आणि त्याच कंपनीचे नाव सांगून फर्निचर व्यावसायिक महेश बनवारीलाल जांगीड यांचीही ४ लाख ६१ हजार ८५० रुपयांनी फसवणूक करण्यात आली. त्यांनाही ट्रेडिंगसाठी अॅप डाउनलोड करण्यास सांगून वेगवेगळ्या ट्रेडिंग ग्रुपमध्ये सहभागी करून रक्कम उकळण्यात आली. या प्रकरणी आचल आणि राघवसिंग राठोड या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलीस पुढील तपास करत आहेत.