DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अयोध्या नगरातील सोनसाखळी चोरी प्रकरणाचा पर्दाफाश

एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई ; दोन आरोपी जेरबंद, सोन्याचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील अयोध्या नगर भागात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळणाऱ्या दुचाकीस्वारांच्या टोळीचा पर्दाफाश एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यातून दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून चोरीस गेलेली सोन्याची लगडदेखील हस्तगत करण्यात आली आहे.

दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी अयोध्या नगरमधील एक महिला घरी दुचाकीने पोहोचत असताना मागून आलेल्या दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने खेचून तेथून पसार झाले होते. या धाडसी चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ८४९/२०२५ भा.दं.वि. २०२३ चे कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास पथक सक्रिय झाले. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपींची ओळख निश्चित करण्यात पोलिसांना मदत मिळाली. १८ नोव्हेंबर रोजी माऊली नगर भागात सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव तेजस अनिल ईखनकर (रा. ज्ञानदेव नगर, जळगाव) असल्याचे सांगितले. तसेच त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या साथीदाराचे नाव प्रसाद उर्फ परेश संजय महाजन (रा. ज्ञानदेव नगर, जळगाव) असे उघड केले. विशेष म्हणजे, प्रसाद उर्फ परेश हा शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्यातून फरार होता.

यानंतर १९ नोव्हेंबर रोजी माऊली नगर परिसरात पुन्हा सापळा रचून दुसऱ्या आरोपी प्रसाद उर्फ परेश महाजन यालाही ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींकडून चोरी केलेल्या मालामधील ८ ग्रॅम वजनाची, अंदाजे ८० हजार रुपये किमतीची सोन्याची लगड जप्त करण्यात आली. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे अयोध्या नगर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

ही संपूर्ण कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोउनि राहुल ताडे, पोउनि चंद्रकांत के., सफौ विजयसिंग पाटील, पोह प्रदीप चौधरी, पोह गिरीश पाटील, पोह प्रमोद लावंजारी, पोह किरण पाटील ठाकूर, पोकॉ किरण पाटील, पोकॉ शशिकांत मराठी, पोकॉ चेतन पाटील यांचा समावेश होता. संपूर्ण कारवाईवर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.