DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

सेंट अलॉयसियस हायस्कूल प्रकरणात अखेर गुन्हा दाखल

भुसावळ : ख्रिश्चन अल्पसंख्याक संस्थेच्या सेंट अलॉयसियस हायस्कूलमध्ये ११ सप्टेंबर २०२५ रोजी घडलेल्या वादग्रस्त प्रकरणी अखेर भुसावळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पंचायत समिती भुसावळचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी किशोर नामदेव वायकोळे (५४) यांनी ६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री पोलिस ठाण्यात हजर राहून फिर्याद दिली. यापूर्वीच भाजपाचे राज्य परिषद सदस्य प्रमोद वामन सावकारे यांच्यासह अन्य हिंदू संघटनांनी उपविभागीय अधिकारी आणि शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली होती.

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी नेमलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीने २६ सप्टेंबर २०२५ रोजी १६ पानी अहवाल सादर केला. या अहवालात पालकांची लेखी संमती ही केवळ सहलीसाठी होती; धार्मिक स्थळ भेट, प्रार्थना, उपदेश, स्कार्फ घालणे किंवा पुस्तक वाटप याबाबत कोणताही उल्लेख नव्हता, असे स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांकडून १०० रुपये घेऊन रिक्षा भाडे दिल्याचा उल्लेख असला तरी शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव किंवा खर्चाचा हिशेब सादर करण्यात आलेला नाही. ऐतिहासिक किंवा शैक्षणिक स्थळाऐवजी फक्त धार्मिक स्थळांना भेट देण्यात आली असून यामुळे भारत स्काऊट्स अ‍ॅण्ड गाईड्सच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे नमूद आहे. मुलींना मशिदीत डोके झाकण्यास भाग पाडणे व “इस्लाम आतंक नव्हे आदर्श” पुस्तक वाटप हा एकाच धर्माला प्राधान्य देणारा उपक्रम असल्याचे समितीने म्हटले आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांच्या जबानीत गंभीर विरोधाभास आढळून आला असून शिक्षण हक्क कायदा २००९ (RTE) आणि महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी नियम १९८१ चे उल्लंघन झाल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मुख्याध्यापिका शिला मॅडम (अनुदानित), उपशिक्षक अमोल वांदळे, शेख इरफान, बर्नार्ड मॉरिस, उपशिक्षिका मिशेल फर्नांडिस (सर्व अनुदानित), शिक्षणसेविका आफरीन खान व कौलीन कौर (अनधिकृत/मान्यताप्राप्त नाही) तसेच खाजगी संगणक शिक्षक गुरजीतसिंग पदम यांचा समावेश आहे. भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक उद्धव डमाळे यांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून लवकरच आरोपी शिक्षक व मुख्याध्यापिकांची चौकशी होणार आहे.

या घडामोडींवर समाजातून मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही हिंदू संघटना व पालकांनी पोलिस कारवाईचे स्वागत करून धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली एका धर्माचा प्रचार करणाऱ्या उपक्रमांवर निर्बंध घालावेत, अशी मागणी केली आहे. तर शाळा प्रशासनाने हा उपक्रम सर्वधर्मसमभाव शिकवण्याचा असल्याचा दावा केला होता; मात्र चौकशी अहवाल व मिळालेल्या निष्कर्षांमुळे शाळेची बाजू कमकुवत ठरत असल्याचे दिसत आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.