नेहरू नगरात तरुण हॉटेल व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव – शहरातील नेहरू नगर परिसरात राहणाऱ्या एका तरुण हॉटेल व्यावसायिकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली असून, दि. १० रोजी ही बाब उघड झाली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
नेहरू नगरमध्ये शुभम रविंद्र मराठे (वय २५) आपल्या आई-वडील, भाऊ आणि बहिणीसोबत वास्तव्यास होता. शुभमचे वडील रविंद्र मराठे हे मोहाडी रोडवर हॉटेल चालवतात, तर शुभम हॉटेलच्या कामात त्यांना मदत करीत होता. त्याचबरोबर तो एका फायनान्स कंपनीतही नोकरीला होता.

बुधवारी घरात कोणी नसताना दुपारी सुमारे २ वाजता शुभमने गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. कुटुंबीयांनी तत्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांवर शोककळा कोसळली.
शुभमने आत्मघातकी पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. एमआयडीसी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.