ग. स. सोसायटी भरतीवरील स्थगिती २४ तासांत मागे
जळगाव : जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग. स. सोसायटीच्या नोकरभरती प्रक्रियेवरून निर्माण झालेल्या वादानंतर घालण्यात आलेली स्थगिती अवघ्या चोवीस तासांत उठवण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाभरात चर्चांना उधाण आले आहे. १८ डिसेंबर रोजी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी पुढील आदेश येईपर्यंत भरती प्रक्रिया थांबवण्याचे निर्देश दिले होते. मात्र संस्थेने मागविलेल्या पाच मुद्द्यांवरील माहिती सादर करताच ती समाधानकारक असल्याचा शेरा नोंदवण्यात आला आणि स्थगिती उठवून भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आज, शनिवार २० डिसेंबरपासून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ग. स. सोसायटीच्या भरतीबाबत जिल्ह्यात तीव्र चर्चा सुरू होती. ऑनलाईन अर्ज मागवून लेखी परीक्षा न घेता केवळ तोंडी परीक्षेच्या आधारे भरती करण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप करण्यात आले होते. या मुद्द्यावरून शिवसेना (शिंदे गट)चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ही भरती रद्द करावी किंवा नामांकित एजन्सीमार्फत पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबवावी, अशी मागणी सहकार मंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी तात्पुरती स्थगिती लागू केली होती.
भरतीसाठी प्रस्ताव सादर करताना सभासद संख्या, सेवानिवृत्त कर्मचारी, रिक्त पदे यांसह पाच मुद्द्यांवरील सविस्तर माहिती देण्याचे आदेश संस्थेला देण्यात आले होते. त्यानुसार ग. स. सोसायटीने आवश्यक कागदपत्रांसह माहिती सादर केली. ही माहिती समाधानकारक असल्याचे नमूद करत भरती ज्या टप्प्यावर थांबवली होती, त्याच टप्प्यापासून पुढे सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेत केवळ तोंडी परीक्षा घेतली जाणार असल्याच्या चर्चेमुळे आर्थिक उलाढालीबाबतही संशय व्यक्त केला जात होता. संचालक मंडळाने सहकार विभागाच्या पत्राचा आधार घेतल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात लेखी परीक्षा होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता कायम आहे.
या भरतीला मोठा प्रतिसाद मिळाला असून लिपिक पदासाठी १,४८७ तर शिपाई पदासाठी १,११३ असे एकूण सुमारे २,६०० अर्ज प्राप्त झाले आहेत. एकूण ६६ पदे भरली जाणार असून आजपासून उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात होणार आहे.
दरम्यान, स्थगिती दिल्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी ती उठवण्यात आल्याने जिल्ह्यात विविध चर्चांना तोंड फुटले आहे. संचालक मंडळाने ‘सूत्रे हलवून’ स्थगिती उठवली, अशी दबक्या आवाजातील चर्चा सुरू असून ग. स. सोसायटीच्या भरती प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.