DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगावात भव्य रोड शो

जळगाव – जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीकडून आज मंगळवार, दि. ६ जानेवारी २०२६ रोजी भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या रोड शोमुळे जळगाव शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून, नागरिकांमध्ये उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी दुपारी अचूक ३ वाजता या रोड शोस प्रारंभ होणार आहे. शहरातील प्रमुख मार्गांवरून हा रोड शो काढण्यात येणार असून, त्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थक सहभागी होण्याची शक्यता आहे.
शास्त्री टॉवर चौक, चित्रा चौक, इष्टपूर्ती गणेश मंदिर, शिवतीर्थ मैदान, नेहरू पूल तसेच सुभाष चौक या महत्त्वाच्या मार्गांवरून रोड शो जाणार आहे. या संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येणार असून, फुलांचा वर्षाव, घोषणाबाजी आणि ढोल-ताशांच्या निनादात रोड शो पार पडणार आहे.
महायुतीकडून जळगाव शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ‘कमळ’, ‘धनुष्यबाण’ आणि ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हांवरील उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागील काही वर्षांत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, स्मार्ट सिटी उपक्रम तसेच विविध नागरी सुविधांच्या माध्यमातून शहराचा विकास झाल्याचे सांगण्यात येत असून, हा विकास अधिक गतीने पुढे नेण्यासाठी महायुतीला पुन्हा संधी देण्याचे आवाहन नेत्यांकडून करण्यात येत आहे.
या ‘विकासाच्या यात्रेत’ सहभागी व्हा,” असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या भव्य रोड शोमुळे जळगाव शहरातील निवडणूक प्रचाराला अधिकृत आणि जोरदार सुरुवात होणार आहे. शहरभर बॅनर्स, झेंडे व फलक लावून जोरदार तयारी करण्यात आली असून, पोलिस प्रशासनाने वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणारा हा रोड शो जळगाव महानगरपालिका निवडणूक प्रचारातील महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, याचा शहरातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.