पाच वर्षांत जळगाव ‘विकसित शहरांच्या’ रांगेत
विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस
जळगाव | प्रतिनिधी
राज्य सरकारने येत्या पाच वर्षांत जळगाव शहराला विकसित शहरांच्या श्रेणीत नेण्याचा ठाम निर्धार केला असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ठाम ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित महायुतीच्या भव्य रोड शो व प्रचार सभेत ते बोलत होते.
“जळगावचे सिंगापूर करण्याच्या अवास्तव घोषणा आम्ही करणार नाही. जळगावची स्वतंत्र संस्कृती आणि ओळख आहे. मात्र, शहराला विकसित शहरांच्या पंक्तीत नेण्यासाठी ठोस, नियोजनबद्ध आणि वास्तववादी पावले उचलली जातील,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर
मुख्यमंत्र्यांनी जळगावसाठी मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. शहरासाठी २५३ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून, मलनिस्सारण व्यवस्थेसाठी २९३ कोटी आणि ३८३ कोटी रुपयांचे दोन स्वतंत्र प्रकल्प मंजूर झाले आहेत. या क्षेत्रात एकूण ८८४ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, घनकचरा व्यवस्थापनासाठी १६.७८ कोटी रुपये, अमृत योजनेंतर्गत ७८ कोटी रुपये तसेच शहरातील उद्यानांच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

औद्योगिक विकासाला चालना; ‘स्पेशल दर्जा’ जाहीर
तरुणांसाठी रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी जळगावला औद्योगिक विकासाच्या दृष्टीने ‘स्पेशल दर्जा’ देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या निर्णयामुळे उद्योजकांना विशेष सवलती मिळणार असून, जिल्ह्यात मोठ्या उद्योगांची उभारणी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विलासराव देशमुख यांचा सन्मान, सावरकरांवरील भूमिका ठाम
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विधानावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्व. विलासराव देशमुख यांच्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांमध्ये आदर आहे. महाराष्ट्राच्या विकासात योगदान देणाऱ्या नेत्यांचा सन्मान केला जातो. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत बोलताना त्यांनी, “सावरकरांचा विरोध आम्हाला कधीही मान्य नाही. ही आमची ठाम आणि स्पष्ट भूमिका आहे,” असे सांगितले.
जळगावमध्ये महायुतीचाच महापौर – फडणवीस
राज्यातील बहुतांश नगरपालिकांमध्ये महायुतीला जनतेचा कौल मिळत असल्याचे सांगत, जळगावमध्येही जनता महायुतीवरच विश्वास दाखवेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. येत्या काळात राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीची सत्ता येईल आणि जळगावचा महापौरही महायुतीचाच असेल, असा दावा त्यांनी केला.
