जळगाव महापालिका निवडणूक २०२६ : प्रभाग क्र. १६ मधून हर्षालीताई कोल्हे व इच्छा दीपक यांची अपक्ष उमेदवारी; १३ रोजी प्रचाराचे आयोजन
जळगाव : जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १६ मधून हर्षालीताई मनीष कोल्हे आणि अत्तरदे इच्छा दीपक यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. हर्षालीताई कोल्हे या प्रभाग क्र. १६ ब मधून अ.क्र. २, निशाणी – पुस्तक, तर अत्तरदे इच्छा दीपक या प्रभाग क्र. १६ क मधून अ.क्र. २, निशाणी – ट्रक या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.
जळगाव शहराचा सर्वांगीण व उज्ज्वल विकास व्हावा तसेच प्रभाग क्र. १६ मधील नागरिकांचे मूलभूत नागरी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावेत, या उद्देशाने दोन्ही उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून त्या प्रभागात सातत्याने सेवाभावी कार्य करत असून सामाजिक, शैक्षणिक व सार्वजनिक क्षेत्रात नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होत आल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रभाग क्र. १६ मधील विकासाचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याचा आपला संकल्प असल्याचे सांगत उमेदवारांनी विकासाचा आराखडा मांडला. प्रभागातील सर्व अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटिकरण व डांबरीकरण करून प्रभाग खड्डेमुक्त करण्याचा मानस असून, अडथळेविरहित पथदिव्यांची उभारणी करून प्रत्येक गल्लीत अत्याधुनिक एलईडी पथदिवे बसवण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पाणीपुरवठा सुरळीत करणे, सांडपाणी गटारींची नियमित स्वच्छता, दैनंदिन साफसफाई आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येणार असल्याचे उमेदवारांनी सांगितले. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक मूलभूत व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहील, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, मंगळवार, दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी प्रभाग क्र. १६ मध्ये प्रचाराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवार नागरिकांशी थेट संवाद साधणार असून विकासाचा दृष्टिकोन व आगामी कार्ययोजना मतदारांसमोर मांडणार आहेत. या प्रचार कार्यक्रमास प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नवीन वर्षात प्रभाग क्र. १६ च्या विकासासाठी नागरिकांनी आपले मोलाचे मत रूपी आशीर्वाद देऊन विजयी करावे व जनसेवेची संधी द्यावी, असे आवाहन दोन्ही अपक्ष उमेदवारांनी केले आहे.