DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

एकाच चितेवर दोन मैत्रिणी: ट्यूशनच्या वाटेवर काळाचा घाला

भुसावळ  : तालुक्यातील साकरी गावात ट्यूशनला निघालेल्या दोन अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनींना विहिरीत ढकलून ठार मारल्याची धक्कादायक घटना मंगळवार, 27 रोजी घडली. या प्रकरणी आरोपीविरोधात भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बुधवारी सकाळी दोन्ही मैत्रिणींवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

साकरीत नेमकं काय घडलं?
साकरी येथील 15 वर्षीय दोन विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी शिकवणीसाठी घरातून निघाल्या होत्या. गावातील एका अल्पवयीन मुलाने त्यांना मोटारसायकलवर बसवून गावालगत असलेल्या अविनाश फेगडे यांच्या शेतातील विहिरीजवळ नेले. तेथे आरोपीने दोन्ही विद्यार्थिनींना विहिरीत ढकलून दिले. विशेष म्हणजे विद्यार्थिनींची दप्तरसुद्धा संशयिताच्या ताब्यात असल्याचे तपासात समोर आले आहे.
या घटनेत दोन्ही विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर मंगळवारी सायंकाळी मृतदेह जळगाव येथे नेण्यात आले, जिथे त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले.

शोकाकुल वातावरणात एकाचवेळी अंत्यसंस्कार
बुधवारी सकाळी शवविच्छेदनानंतर दोन्ही विद्यार्थिनींचे पार्थिव साकरी येथे आणण्यात आले. सकाळी 10 वाजता स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात दोन्ही मैत्रिणींवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.