परळी वैजनाथ येथील ‘अखिल भारतीय पशु-पक्षी प्रदर्शन
महा पशुधन एक्स्पो-२०२६ च्या अधिकृत लोगोचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते अनावरण
जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने आगामी १३ ते १५ फेब्रुवारी,२०२६ या कालावधीत परळी वैजनाथ, जि.बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक ‘अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो-२०२६ प्रदर्शना’च्या अधिकृत लोगोचे अनावरण आज जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात झाले.
याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, उपसंरक्षक राम धोत्रे, आदित्य मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी राहुल इधे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व दुग्ध व्यवसाय डॉ प्रदिप झोड, सहाय्यक पशुसंवर्धन अधिकारी डॉ.हेमंत कुमावत उपस्थित होते.
लोगो अनावरणानंतर बोलताना जिल्हाधिकारी श्री.घुगे म्हणाले की, “पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परळी वैजनाथ येथे होणारे हे प्रदर्शन देशातील जातीवंत पशुधन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम असणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान घरबसल्या पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालक, तरुण उद्योजक आणि शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनास भेट देऊन आपले ज्ञान व उत्पन्न वाढवावे.”
महा पशुधन एक्स्पो, २०२६ प्रदर्शनाची मुख्य आकर्षणे संदर्भात
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी प्रदर्शनाबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, या प्रदर्शनातः राज्यातील व राज्याबाहेरील जातीवंत गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या आणि पक्ष्यांच्या विविध प्रजातींचे दर्शन घडणार आहे. आधुनिक डेअरी फार्मिंग, चारा नियोजन आणि प्रक्रिया उद्योगांचे भव्य स्टॉल्स असणार आहेत. पशुधनाचे आरोग्य, लसीकरण आणि वैज्ञानिक संगोपन यावर तज्ज्ञ पशुवैद्यकांची विशेष व्याख्याने आयोजित केली आहेत.
आजच्या लोगो अनावरणानंतर संपूर्ण जिल्ह्यात प्रदर्शनाची व्यापक प्रसिद्धी मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्था, पंचायत समिती आणि सार्वजनिक ठिकाणी बॅनर व पोस्टर्सच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ‘घरपोच माहिती देण्याचे नियोजन विभागाने केले आहे. तरी, जिल्ह्यातील सर्व पशुपालक बांधवांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.