श्री मंगळग्रह मंदिरात नामदार अनिल पाटील यांचे जंगी स्वागत
नवकार कुटिया लोकार्पणासह झाली प्रसादतुला
अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात नामदार अनिल पाटील यांचे ७ जुलै रोजी प्रथम आगमन व वाढदिवसानिमित्त जंगी स्वागत करण्यात आले. नामदार पाटील यांच्या शुभहस्ते नव्याने सुशोभीकरण केलेल्या नवकार कुटियाचे लोकार्पण करण्यात आले. मंदिराचा अधिकृत प्रसाद असलेल्या गोडशेवने त्यांची तुलाही करण्यात आली. या गोडशेवचे उपस्थित हजारो समर्थक व भाविकांना वाटप करण्यात आले.
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मी अमळनेरला आल्यावर सर्वप्रथम श्री मंगळ ग्रह मंदिरात जाऊन दर्शन घेईल व तेथूनच अभिवादन मिरवणुकीला प्रारंभ होईल, असे नामदार पाटील यांनी जाहीर केले होते .त्याप्रमाणे सर्वप्रथम ते मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आल्यावर मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. तेथून त्यांना वाजतगाजत मंदिराजवळ आणण्यात आले. तेथे त्यांना मंदिराच्या सुरक्षारक्षकांनी मानवंदना दिली. तत्पूर्वी मंदिराच्या रस्त्यावर दुतर्फा उभे असलेल्या मंदिराच्या सेवेक-यांनी नामदार पाटील, त्यांच्या पत्नी जयश्री पाटील व त्यांच्या परिवारातील सदस्यांवर जोरदार पुष्पवृष्टी केली. रस्त्यावर संस्थेतर्फे मोठमोठे फलक व नामदार पाटील यांचे कटआऊट्स लावण्यात आले होते. मंदिराचे मनोहारी सुशोभिकरण केले होते. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी विश्वस्त मंडळ व सेवेक-यांच्या सौभाग्यवतींनी नामदार पाटील यांचे औक्षण करून त्यांच्यावर अक्षता व पुष्पवृष्टी केली. त्यानंतर मंदिरात नामदार पाटील व त्यांच्या परिवाराने संकल्प सोडून छोटेखानी पूजा केली. मंदिराचे पुजारी गणेश जोशी,जयेंद्र वैद्य व तुषार दीक्षित यांनी पौरहित्य केले.यावेळी नामदार पाटील यांच्या सन्मानार्थ जोरदार घोषणाबाजी झाली. वाढदिवसानिमित्त नामदार पाटील व जयश्री पाटील यांना एकत्रित भव्य पुष्पहार, श्री मंगळदेवाची मोठी प्रतिमा तसेच शाल, श्रीफळ देऊन मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, सौ. जयश्री साबे, आनंद महाले, विनोद कदम, उमाकांत हिरे, निलेश महाजन, चंद्रकांत महाजन, राहुल पाटील, उज्ज्वला शाह आदींनी स्वागत केले.
यावेळी माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील हजारो मान्यवर उपस्थित होते.