दुर्दैवी ! वादळी वाऱ्यामुळे कंटेनर पलटी; दोघांचा दबून मृत्यू
दिव्यसारथी ऑनलाईन डेस्क : दि.२७ एप्रिल २०२३ : जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसापासून बचाव करण्यासाठी काही लोक एका कंटेनरच्या आडोश्याला उभे होते. मात्र, वादळी वाऱ्यामुळे हा कंटेनर पलटी झाला. त्याखाली दबल्याने दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना चिंचोली (Chincholi) (ता. जळगाव) येथे गुरुवारी (दि. २७) दुपारी ३ च्या सुमारास घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील चिंचाली गावाजवळ नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकामाचे काम सुरू आहे. या ठिकाणी काही बिहारी मजूर हे दोन महिन्यांपासून काम करत आहे. गुरुवारी (दि. २७) दुपारी तीनच्या सुमारास वादळी पावसाने हजेरी लावली. यावेळी वादळापासून जीव वाचविण्यासाठी मजूरांनी पत्र्याच्या शेडमध्ये धाव घेतली. मात्र, वादळी वाऱ्यामुळे पत्र्याचे शेड देखील उडाले. त्यामुळे मजुरांनी पटांगणात उभा असलेल्या कंटेनरच्या बाजूला आडोसा घेतला होता.
दोघांचा जागीच मृत्यू : वादळी वाऱ्यामुळे कंटेनर पलटी झाला. या कंटेरनखाली भोला श्रीकुसूम पटेल (रा. सानीकावा, जि. सिवान बिहार) आणि चंद्रकांत वाभळे (वय ५२, रा.चाळीसगाव ह.मु. पुणे) हे दबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला अफरोज आलम (वय-२३) हा जखमी झाला. जखमीला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.