औरंगजेबाच्या कबरीवरील वाद अनावश्यक – भय्याजी जोशी
नागपूर – औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वादंग निर्माण झाला असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तणाव वाढला आहे. नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा विषय प्रासंगिक नसल्याचे सांगत हिंदू संघटनांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला होता.
संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी हा वाद अनावश्यक असल्याचे स्पष्ट करत, कबरीवरून वाद उभा करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे भाजपलाही जहाल भूमिकेवर नियंत्रण ठेवावे लागेल, असे संकेत मिळत आहेत. नागपूरच्या घटनांनंतर संघाने अधिकृतपणे स्पष्ट केले होते की, कबरीवरून विवाद करणे संयुक्तिक नाही आणि अशा आंदोलनांना पाठिंबा दिला जाणार नाही. तरीदेखील विश्व हिंदू परिषद कबरीच्या विरोधात आपली भूमिका ठामपणे मांडत आहे, ज्यामुळे भविष्यात पुन्हा आंदोलन होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी हा मुद्दा बाबरी मशिदीच्या आंदोलनाशी जोडून भविष्यातील घडामोडींकडे लक्ष वेधले होते. मात्र, भय्याजी जोशी यांनी या वादाला पूर्णविराम देत स्पष्ट केले की, औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दाच अनावश्यक आहे. ते म्हणाले, “औरंगजेब इथेच मृत्यू पावल्यामुळे कबर बांधली गेली. ती भारताच्या सर्वसमावेशकतेचे प्रतीक आहे. मात्र, आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजच राहतील.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कबरीला कायदेशीर संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे सांगितले. पण औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. संघाने घेतलेल्या भूमिकेनंतर या विषयावर राजकीय वाद कमी होण्याची शक्यता आहे.