DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

एरंडोल येथील शिबिरात १३५ कर्मचाऱ्यांची ‘दांडी’

एरंडोल : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येथे कर्मचाऱ्यांचे प्रथम प्रशिक्षण शिबिर रा. ति. काबरे विद्यालय आणि कमल लॉन्स येथे दोन सत्रात घेण्यात आले. शिबिरास १३५ अधिकारी व कर्मचारी गैरहजर राहिल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. दरम्यान, गैरहजर राहिलेल्या कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी उद्या (ता.११) प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एरंडोल विधानसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण शिबिर काबरे विद्यालय व कमल लॉन्स येथे दोन सत्रात झाले. कमल लॉन्स येथे झालेल्या प्रथम सत्रात शिबिरात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड आणि पारोळ्याचे तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट सिलिंग सेटिंग करण्याची प्रक्रिया पीपीटीद्वारे समजावून सांगितली. प्रथम सत्रातील शिबिरात ३८० मतदान केंद्राध्यक्ष व ३८१ प्रथम मतदान अधिकारी असे ७६१ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दुपारच्या सत्रात १०८९ अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. सर्व कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे काम यशस्वीपणे पार पाडावे, असे आवाहन प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांनी केले. मतदान यंत्र अथवा निवडणुकीसंदर्भात कोणतीही अडचण असल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधाव, असे सांगितले. रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालयात झालेल्या दोन सत्रातील प्रशिक्षण शिबिरात सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले. ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची प्रत्यक्ष जोडणी करणे, अभिरूप मतदान करणे, मतदान साठवणे व त्यानंतर मतदान क्लीअर करणे, मतदान प्रक्रिया सुरू असताना निर्माण झालेल्या अडचणी कशा पद्धतीने सोडविण्यात याव्यात, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट याबाबत प्रश्नावली सोडविणेबाबत तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी मार्गदर्शन करून प्रशिक्षण दिले. शिबिरात २२ वर्गात प्रत्येकी ५० कर्मचारी असे १ हजार ८५० कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते. या शिबिरात प्रत्येक वर्गात तलाठी, मंडळाधिकारी, तसेच सेक्टर अधिकारी उपस्थित होते. या वेळी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी निरसन केले. शिबिरास १३५ कर्मचारी व अधिकारी गैरहजर राहिल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी उद्या (ता.११) प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.