जिल्हा बँक अध्यक्ष संजय पवार राष्ट्रवादीतून बडतर्फ
जळगाव : प्रतिनिधी
पक्षाशी बंडखोरी करीत भाजप-शिंदे गटाच्या सहाय्याने जिल्हा बंॅकेचे चेअरमनपद मिळवणारे संजय पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हकालपट्टी (बडतर्फ) करण्यात आली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे गटासोबत पॅनल करुन राष्ट्रवादी-भाजपच्या नेत्यांची एकत्रित बॅनरबाजी व पक्षविरोधी कारावाया करणे पवार यांना भोवले आहे. यापुढे पक्षाचे नाव, चिन्ह, नेत्यांचे फोटो न वापरण्याची त्यांना तंबी देण्यात आली असून तसे केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिला आहे.
धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत पवार यांनी पक्षाच्या कोणत्याही पदावर नसताना शिंदेसेना-भाजप-राष्ट्रवादी प्रणीत सहकार पॅनलच्यावतीने निवडणूक लढवली.त्याबाबत राष्ट्रवादी कांॅग्रेसचे नेते अजीत पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मंत्री गिरीश महाजन यांचे एकत्रित फोटो असलेले बॅनर धरणगावमध्ये लावले होते. त्याबाबत राष्ट्रवादी कांॅग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांनी पक्षाकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी कांॅग्रेस पार्टी-संजय पवार गट अशा प्रकारचा उल्लेख करुन पक्षाचे नाव, चिन्ह, नेत्यांचे फोटो लावून पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केलेला होता. राष्ट्रवादी पक्षामध्ये अशा प्रकारचा कोणत्याही प्रकारचा गट नाही. ते बॅनर्स,पोस्टर्स तातडीने काढून टाकण्यात यावेत.अशा सूचना सरचिटणीस गर्जे यांनी २१ एप्रिल रोजी एका पत्रानुसार पवार यांना दिल्या होत्या. त्यानुसार पवार यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. लेखी खुलासा पाठवण्याचीही तसदी घेतली नाही. पक्षविरोधी कृत्य करु नये अशा वारंवार सूचना देऊनही पवार यांनी राष्ट्रवादी कांॅग्रेस पक्षाच्या विरुध्द कारवाया करुन पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरवण्याचे कृत्य करत असल्याचे निर्दशनास आल्याने पवार यांना १६ मे पासून पक्षातून बडतर्फ करण्यात आल्याचे गर्जे यांनी पत्रात नमूद केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत एका प्रचार सभेत पवार यांनी जळगाव ग्रामीण मतदार संघाचे राष्ट्रवादी कांॅग्रेसचे आपणच उमेदवार असणार असल्याचेही जाहीर केले होते. जिल्हा दूध संघ, जिल्हा बंॅक व धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पवार भाजप-शिंदेसेनेसोबत होते.
गिरीश महाजनांच्या वाढदिवसाच्या जाहीरातीत शरद पवार, अजीत पवारांचे फोटो…
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा बुधवारी वाढदिवस साजरा झाला. या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणारी जाहीरात पवार यांनी एका दैनिकात छापली आहे. स्वत:ला सहकार क्षेत्रातील महामेरु संबोधत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकत्रित फोटो तसेच विरोधी पक्षनेते अजीत पवार यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजनांसोबतचे फोटो त्या जाहीरातीत वापरलेले आहेत.