जिल्ह्यात एचआयव्ही एड्स नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी
एच.आय.व्ही चाचणीचे सहा महिन्यातच ७५ टक्के उद्दिष्ट पूर्ण
जळगाव;- जिल्ह्यात एचआयव्ही एड्स नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. यासाठी एचआयव्ही बाबत जाणीव-जागृतीची मोहीम राबविण्यात यावी. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे दिल्या.
जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागाची मासिक आढावा सभा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, डॉ. आकाश चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भोयेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ विजय गायकवाड, जिल्हा एड्स नियंत्रण विभागातील कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर, गिरीश गडे, माहिती अधिकारी सुरेश पाटील, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी तसेच तसेच जिल्हा एड्स नियंत्रण विभागांतर्गत वेगवेगळ्या विविध गटांमध्ये कार्यरत सामाजिक संस्थाचे कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील एच.आय.व्ही चाचणीचे सहा महिन्यातच ७५ टक्के उद्दिष्ट पूर्ण आहे ही चांगली बाब आहे. शब्दात या कार्यक्रमातील जिल्ह्यातील प्रगतीचे कौतुक करत जिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले, एच.आय.व्हीसह जीवन जगणाऱ्या लोकांना व अति जोखीम गटातील लोकांना रेशन कार्ड, धान्य पुरवठा व इतर शासकीय योजना देण्याबाबत प्राधान्याने कार्यवाही करावी. जिल्ह्यातील जास्तीत जास्त खाजगी प्रयोगशाळा / रुग्णालये यांनी जिल्हा एड्स नियंत्रण विभागास एच.आय.व्ही संसर्गचा अहवाल दर महिन्याला सादर करावा.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री पहूरकर म्हणाले, तालुका स्तरावर एच.आय.व्ही संसर्गितांची नियमित मॅपिंग करण्यात येत आहे. एच.आय.व्ही संसर्गित बालकासाठी प्रोटीन पावडर उप्लब्धतेकरिता प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सोशल मीडियावर ( https://www.facebook.com/dapcu.jalgaon/) एच.आय.व्ही / एड्स विषयी प्रसिद्धी करण्यात आली आहे.
एच.आय.व्ही एड्स टोल फ्री क्रमांक ‘१०९७’
यावेळी एचआयव्ही एड्स बाबत माहिती, शंका तसेच तपासणी बाबत माहिती जाणून घेण्यासाठी सर्वसामान्य व्यक्ती टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतो. एच.आय.व्ही एड्स टोल फ्री क्रमांक १०९७ व एच.आय.व्ही तसेच एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा २०१७, एच.आय.व्ही एड्स QR कोड बोर्ड व हेल्पलाईनचे प्रकाशन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते झाले.
जिल्ह्यात ४४६ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह
जिल्ह्यात २०२२-२३ व २०२३-२४ अशा एकूण अठरा महिन्यात ४४६ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये सर्वसाधारण म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती ४१५ व गरोदर माता ३१ असे एकूण ४४६ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यासाठी सर्वसाधारण २८५२६१ व्यक्तींच्या एचआयव्ही टेस्ट करण्यात आल्या तर गरोदर माता १४१२२६ जणांच्या एचआयव्ही टेस्ट करण्यात आल्या आहेत. अशी माहिती श्री. पहूरकर यांनी बैठकीत सादर केली.