शहरातील ६२०० फेरीवाल्यांना पीएम स्वनिधीचा लाभ
जळगाव – : महापालिकेच्या माध्यमातून पीएम स्वनिधी अंतर्गत शहरातील ६ हजार २०० फेरीवाल्यांना विना तारण बिनव्याजी प्रत्येकी १० हजार रुपयांचे अर्थसहाय्य व्यवसायासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच आता बचत गटांच्या महिलांना देखील पीएम स्वनिधीतून प्रत्येकी १० हजार रुपयांचे अर्थ सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
केंद्र शासनाकडून फेरीवाल्याना बिन व्याजी व विना तारण प्रत्येकी १० हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची योजना राबविण्यात येत आहे. एका वर्षांत टप्प्या टप्प्याने ही रक्कम परत फेड करावयाची असून पहिले १० हजार रुपयांची फेड झाल्यानंतर २० हजारांचे अर्थसहाय्य व २० हजारांची फेड झाल्यानंतर ५० हजार रुपयांचे अर्थ सहाय्य या योजनेतून मिळणार आहे. पुर्वी ही योजना फक्त फेरीवाल्यांसाठी लागू करण्यात आली होती, मात्र, आता या योजनेचा लाभ बचत गटांमधील महिलांना देखील मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या सहाव्या मजल्यावरील बी विंगमधील कर्मचाऱ्यांना भेटावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.