DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

वादळी वाऱ्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील थोरपाणी या वस्तीवर झालेल्या भयंकर दुर्घटनेत एकाच गरीब आदिवासी कुटुंबातील चौघांचा गुदमरून मृत्यू झाला असून आठ वर्षाचा बालक मात्र सुदैवाने बचावला आहे. काल सायंकाळी यावल तालुक्याला वादळी वाऱ्याचा फटका बसला. यात अनेक गावांमधील शिवारांमध्ये असलेले पीक जमीनदोस्त झाले असून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. तर यावल तालुक्यातील थोरपाणी या आदिवासी बहुल वाडीवस्तीवर वास्तव्यास असलेल्या पावरा कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. दि.२६रोजी सायंकाळी सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे नानसिंग गुला पावरा यांचे कुटुंब हे दरवाजा बंद करून घरात बसलेले होते. इतक्यात वादळामुळे त्यांचे घर कोसळल्यामुळे नानसिंग, त्यांची पत्नी आणि तीन मुले असे एकूण पाच जण ढिगाऱ्याखाली अडकले. त्यांना श्वास घेण्यासाठी अडचणी आल्या. यामुळे गुदमरून नानसिंग गुला पावरा (वय २८ ); त्यांची पत्नी सोनूबाई नानसिंग पावरा (वय २२) तसेच रतीलाल हा तीन वर्षाचा मुलगा तर बालीबाई ही दोन वर्षांची मुलगी जागीच ठार झाली. दरम्यान, खूप प्रयत्न करून या ढिगाऱ्याखालून याच कुटुं‌बातील शांतीलाल नानसिंग पावरा (वय ८) हा बाहेर पडल्याने त्याचे प्राण वाचले. त्याने बचावासाठी आरोळ्या मारून परिसरातील लोकांना बोलावल्यावर या दुर्घटनेची माहिती जगाला मिळाली. पावरा कुटुंबातील चौघे मयत झाले असले तरी शांतीलाल हा मात्र सुदैवाने बचावला आहे. आयुष्याची दोरी बळकट असल्यानेच इतक्या भयंकर दुर्घटनेतून तो वाचल्याची भावना ग्रामस्थांनी बोलून दाखविली.
थोरपाणी येथील दुर्घटनेची माहिती मिळताच तहसीलदार मोहनमाला नाझरकर आणि पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांनी आपल्या सहकाऱ्यासह थोरपाणी या पाड्यावर धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत मृतदेह ढिगाऱ्याखालून काढून शव विच्छेदनासाठी यावल येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. येथे वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे, डॉ. तुषार सोनवणे, डॉ. सौरव भुताने यांनी शवविच्छेदन केले व मृतदेह मयत नानसिंग पावरा यांच्या कुटुंबीयास सोपवण्यात आले या चौघांवर शोकाकुल वातावरणात थोरपाणी येथे अंतसंस्कार करण्यात आले.

कुटुंबास मदतीची अपेक्षा
नानसिंग पावरा हे गरीब कुटुंब असून घर कोसळल्याने त्यांचा सहा वर्षाचा मुलगा वगळता संपूर्ण परिवार ठार झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आता मयतांचा वारसदार शांतीलाल पावरा याला शासकिय नियमानुसार भरीव मदत मिळावी, तसेच त्याच्या शिक्षणासह उपजिविकेची जबाबदारी शासनाने उचलावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

माजी आमदारांनी केले सांत्वन
घटनेची माहिती मिळताच चोपड्याचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी थेट यावल ग्रामिण रूग्णालय गाठले, भाजपा पदाधिकारी व येथे मयत यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

 

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.