जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी १६ फेब्रुवारीला भव्य परिषद
उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेश पाटील प्रमुख पाहुणे
जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रीकल्चरच्या वतीने १६ फेब्रुवारी रोजी `जळगाव जिल्हा विकास परिषद` आयोजित केली आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाठी दिशा ठरविणारी ही परिषद असणार आहे. जळगांव येथील छत्रपती संभाजी महाराज नाट्यसंकुलात दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत भव्य परिषद संपन्न होत आहे. ही माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी आणि जळगाव जिल्हा विकास परिषदेच्या प्रोजेक्ट चेअरपर्सन संगीता पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र सरकारचा उद्योग विभाग, एमएसएमई, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग संचलनायालयाच्या वतीने ही भव्य विकास परिषद संपन्न होत आहे. महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, जळगांवचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगांवचे खासदार उन्मेश पाटील या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत परिषद होत आहे. उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र कुशवाह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा, जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल, आयुक्त विद्या गायकवाड, जैन इरिगेशन एम.डी. अतुल जैन हे विशेष अतिथी म्हणून परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी आणि परिषदेच्या प्रोजेक्ट चेअरपर्सन संगीता पाटील अधिक माहिती देताना म्हणाल्या, राज्याची व्यापार, उद्योग, व्यावसायिक, कृषीपूरक उद्योगाची शिखर संस्थेने ही परिषद आयोजित केली आहे. महाराष्ट्र चेंबर १९२७ पासून यशस्वीपणे कार्यरत आहे. महाराष्ट्राच्या औद्योगिकरणाचा पाया महाराष्ट्र चेंबरने उभारण्यात मोठा हातखंडा आहे. या परिषदेमुळे जळगाव जिल्ह्याचा कायापालट होणार आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. तर जळगाव जिल्ह्यातील व्यापार, उद्योगाच्या अनुषंगाने उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.
ही परिषद एकूण पाच सत्रात होणार आहे. पहिले सत्र ब्रॅण्ड जळगाव विकसित करणेबाबत, दुसरे सत्र जळगाव जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रासाठी विकासाच्या संधी, तिसरे सत्र जळगाव जिल्ह्यातील व्यापार व सेवा क्षेत्रातील विकासाच्या संधी, जळगांव जिल्ह्यातील कृषी प्रक्रिया उद्योगांना विकासाची संधी आणि शेवटच्या पाचव्या सत्रात महिला व युवकांसाठी उद्योगातील संधी आणि प्रोत्साहन योजना विषयावर चर्चा आणि ठोस निर्णय घेतले जाणार आहेत. या परिषदेत जळगाव जिल्ह्यातील व्यापारी औद्योगिक संघटना, असोसिएशन, ट्रस्ट, महामंडळे आदी सहभागी झाली आहेत. या परिषदेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन गव्हरर्निंग कौन्सिल मेंबर नितीन इंगळे, पुरुषोत्तम तावरी, दिलीप गांधी यांनी केले आहे.
डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरची स्थापना
केंद्रीय वाहतूकमंत्री आणि भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र चेंबरतर्फे राज्यातील ३६ जिल्ह्यात डेव्हलपमेंट फोरम स्थापन करण्यात येत आहे. या फोरमच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाचे धोरण निश्चित केले जाणार आहे. व्यापार, उद्योग, कृषी, उद्योग, पर्यावरण, पर्यटन क्षेत्रातील संस्थासह लोकप्रतिनिधी, जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख, राजकीय पक्षांचे प्रमुख या सर्वांचा समावेश असलेली ही समिती असणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी हे फोरम महत्वाची भूमिका बजाविणार आहे.
राज्यातील महिला उद्योजकता अभियानाचा शुभारंभ
राज्यातील महिलांना उद्योगात येण्यासाठी मार्गदर्शन, सहाय्य आणि प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र चेंबरतर्फे २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक कालावधीत महिला धोरण जाहीर झाले. त्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारचा उद्योग विभाग, भारत सरकारचे सूक्ष्म, लघु आणि मध्यम मंत्रालय आणि महाराष्ट्र चेंबर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय महिला उद्योजकता अभियानाचा शुभारंभ केला जाणार आहे. चेंबरच्या अत्यंत महत्वपूर्ण महिला उद्योग समितीच्या अध्यक्षपदाचा मान प्रथमच जळगांवला मिळाला असून चेअरपर्सन म्हणून सौ. संगीता पाटील ही संकल्पना राज्यभर राबवित आहेत.