जैन भूमिपुत्र ‘रामलल्ला’ विशेषांकाचे हनुमान जयंती दिनी प्रकाशन
रामलल्लाच्या प्रतिमेसह, विशेषांकाचे जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांना वाटप
जळगाव | प्रतिनिधी
‘प्रभू श्रीरामांचे परमभक्त श्री हनुमान हे सेवेचे, स्वामीभक्तीचे, संस्कारशीलतचे ते प्रतिक होय. याच संस्कारातून जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. आणि जैन परिवार सेवाभाव जोपासत आहे. प्रभू ‘रामलल्ला’ विशेषांकाचे प्रकाशन आज ग्रामदैवत श्रीराम मंदिरात झाले. या पार्श्वभूमीवर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह सहकाऱ्यांकडून आध्यात्मिक, धार्मिक आणि सेवाभाव जोपासला जावा ही प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना’ ह.भ.प. मंगेश महाराज जोशी यांनी व्यक्त केली.
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. निर्मित जैन भूमिपुत्र ‘रामलल्ला’ विशेषांक हनुमान जयंतीदिनी प्रकाशन आज श्रीराममंदीर येथे झाले. त्याप्रसंगी ह.भ.प. मंगेश महाराज बोलत होते. यावेळी कानळदा कण्वआश्रमचे स्वामी अद्वैतानंद चंद्रकिरण महाराज, ह.भ.प. श्रीराम महाराज, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, केशवस्मृतीचे अध्यक्ष भरत अमळकर, दीपक घाणेकर, अनिल राव, भालचंद्र पाटील, योगेश्वर गर्गे, स्वानंद झारे, सचिन नारळे, उदय भालेराव, ललीत चौधरी, संदीप रेदासनी, संजय रेदासनी, राजेश नाईक, महेंद्र पुरोहित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भूमिपुत्र संपादकीय मंडळाचे सदस्य अनिल जोशी, किशोर कुळकर्णी, देवेंद्र पाटील यांचीसुद्धा यावेळी उपस्थिती होती. अशोक जैन यांनी रामलल्ला विशेषांक निर्मितीमागची भूमिका विशद केली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल जोशी यांनी केले.
अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, कान्हदेशातील प्रभू रामचंद्रांच्या पाऊलखुणा, रामलल्ला प्रतिष्ठापनाप्रसंगी जळगाव शहरात लालबहादूर शास्त्री टॉवरसह विविध चौक, उद्याने येथे उत्साहाने-आनंदाने करण्यात आलेली सुंदर सजावट, अशोक जैन यांना अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मिळालेले निमंत्रण, अयोध्या यात्रेची अनुभूती, जळगावचे ग्रामदैवत असलेल्या जुन्या राममंदिरासह कान्हदेशातील मंदिरांचा थोडक्यात इतिहास अशा वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण विषयांसह रामलल्ला विशेषांक भावपुष्पांची श्रद्धाशील मांदियाळी असणारा आहे.
‘आयुष्याच्या वाटचालीत देशात-परदेशात वेगवेगळ्या निमित्ताने कितीही भ्रमंती झाली असली तरी अयोध्या येथील अनुभव हा केवळ औपचारिक प्रवासाचा अनुभव, एवढ्याच पातळीवर न राहता, आयुष्याच्या वाटचालीला भावार्थ देणारी ती एक साक्षात पवित्र अनुभूती होती! आनंदाला आध्यात्मिक आचारविचारांचे, श्रद्धाशील अंत:करणाचं कोंदण असलं तर शब्दातीत प्रचीती येते हे निश्चित! जैन परिवारातील पूर्वजांची पुण्याई आहेच, जिल्हावासियांच्या सदिच्छाही कायमस्वरूपी पाठीशी असल्यामुळेच अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची अनुभूती प्राप्त होऊ शकली याची विनम्र जाणीव आहे, राममंदिर साकार करणाऱ्या सर्वांविषयी, त्यांच्या परिवारातील सदस्यांविषयी नितांत आदर भावना आणि कृतज्ञता मनात ठेवत रामलल्ला विशेषांक सचित्र शब्दातीत केला आहे.’ अशी प्रतिक्रिया अशोक जैन यांनी यावेळी दिली.
जैन भुमिपूत्र ‘रामलल्ला विशेषांक’ जैन इरिगेशनच्या सर्व दहा हजार सहकाऱ्यांना वितरीत करण्यात आला, यासोबत गृहपत्रिकेचा नेहमीचा अंक, प्रभू रामलल्लांची प्रतिमा आणि प्रसाद वाटप करण्यात आला.