दीपस्तंभ मनोबल प्रकल्पात यापुढे मी सुद्धा माझे योगदान देणार : डॉ.आनंद कुमार
जळगाव : प्रतिनिधी
ज्या घटकांचा कधी विचार झाला नाही अश्या समाजातल्या घटकांसाठी मनोबल अद्भुत काम करत आहे. हे ईश्वरी काम आहे. देशातल्या दिव्यांग अनाथांसाठी अत्यावश्यक असलेल्या कामात या पुढे मी सुद्धा माझे योगदान देणार आहे असे प्रतिपादन ‘सुपर ३०’ चे संस्थापक डॉ.आनंद कुमार यांनी केले.
दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल प्रकल्पात विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार राजेश यावलकर, संस्थेच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका शोभा अवचट, कॅनडास्थित संस्थेचे ग्लोबल सदस्य परेश यादव, यजुर्वेंद्र महाजन उपस्थित होते. सूत्रसंचालन नेहा गायकवाड हिने केले.
प्रास्ताविकात बोलतांना यजुर्वेंद्र महाजन असे म्हणाले कि, आनंदजींच्या प्रेरणेने भारतात अनेकांनी स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात काम सुरु केले त्यात आम्हीही आहोत. समाजात सर्वात जास्त गरज असलेल्या घटकाला मदत करण्याचे काम आनंदजी करत आहे आणि तेच काम दीपस्तंभ मनोबल प्रकल्पात होत आहे. त्यांच्या मनोबल भेटीने आंम्हाला काम करण्यास नवीन ऊर्जा मिळणार आहे.
दिव्यांग असूनही खचुन न जाता मेहनतीच्या जोरावर स्वतःचे आयुष्य घडविणारे माझे काका आयुष्याच्या शेवटच्या क्षणांपर्यत गरीब, होतकरू विद्यार्थिनींना निशुल्क शिकवत राहिले. त्याच काकांच्या प्रेरणेने ‘सुपर ३०’ काम सुरु झाले. मनोबलच्या माध्यमातून जुळून भविष्यात काम करायला आंम्हाला नक्कीच आवडेल, त्यासाठी लवकरच आमचा प्रतिनिधी इथे पाठवेल अश्या भावना आनंद कुमार यांनी या प्रसंगी बोलून दाखविल्या.