मराठी बोलला नाहीत तर कानफटात बसणार : राज ठाकरे
मुंबई : महाराष्ट्रात मराठीचा मान राखला गेलाच पाहिजे. मराठी माणसाला विळखा पडत असून, मुंबईत आम्हाला सांगता की, मराठी बोलणार नाही; मात्र मराठी बोलला नाहीत, तर कानफटात बसणारच, असा खणखणीत इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला. तसेच, महाराष्ट्राचे प्रश्न सोडविणार असतील, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमचा पाठिंबा असेल, अशी महत्त्वपूर्ण घोषणाही त्यांनी केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क येथे राज ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेत राज यांनी देशातील नदी प्रदूषण, यासोबतच राज्यात सुरू असलेला हिंदू-मुस्लिम तणाव, औरंगजेबाच्या कबरीचा वाद यावर भाष्य केले.
मराठीत बोलणार नाही, अशी भाषा केली जात आहे. प्रत्येक राज्याची राजभाषा असते, तिचा सन्मान राखला गेलाच पाहिजे. मराठी म्हणून कडवटपणे उभा राहिलाच पाहिजे. मराठी म्हणून एक झालो, तरच राजकारण्यांचे पाय लटपटतील. मराठीचा अवमान होणार असेल, तर कानफटीतच बसेल, असा इशारा देतानाच येत्या काळात महाराष्ट्रातील प्रत्येक आस्थापनेत – बँकेत मराठी भाषा वापरली जाते का, हे तपासा, असा नवा कार्यक्रम आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. इतिहासात पानात खोलवर गेलात ना, तर सगळ्या कल्पना-अपेक्षांची भांडी टळाटळ फुटतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. आता निवडणुका होऊन गेल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात महाराष्ट्रासारखे सुसंस्कृत राज्य आले असून, चांगल्या पद्धतीने जर महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे प्रश्न सोडवणार असतील, तर त्यांना आमचा पाठिंबा राहील. मात्र, प्रत्येक गोष्ट समजून करा, असेही राज म्हणाले.
जिजाऊसाहेबांना एक कडवट, प्रभावी स्वप्न पडले. छत्रपती शिवराय हा हिंदप्रांतावर केलेला संस्कार आहे. चमत्कार आणि विलक्षण घटना आहे, तो एक विचार आहे. शिवरायांच्या आधी प्रत्येक सरंजामदार कोणत्या तरी सलतनीत कामाला होतेच. जसा अफझल खानाचा वकील हा कुलकर्णी ब्राह्मण होता, तसा शिवरायांचा वकीलही ब्राह्मणच होता. 300-400 वर्षांपूर्वीची स्थिती वेगळी होती. त्यावर आपण आज भांडत बसलो आहोत. शिवाजी नावाचा विचार औरंगजेबाला मारायचा होता. ते त्याला जमले नाही. सगळे प्रयत्न केले आणि शेवटी तोच इथे मेला. आपण मराठ्यांनी, महाराष्ट्राने ज्यांना ज्यांना गाडले, त्यांची प्रतीके नेस्तनाबूत करून चालणार नाही. ती जगाला दाखविली पाहिजेत. आम्ही यांना गाडले आहे, असेही राज म्हणाले.
देशभर विद्युतदाहिन्या व्हाव्यात
चित्रपटाने जागे होणारे हिंदू कामाचे नाहीत, देशभरात विद्युत दाहिन्या झाल्या पाहिजेत. विद्युत वाहिन्या झाल्या, तर लाकूड लागणार नाही. लाकूड लागले नाही, तर जंगले राहतील. महाराष्ट्रातील नद्यांची परिस्थितीही बिकट आहे. कोकणातील सावित्री नदी केमिकलने भरली आहे. महाराष्ट्रातील 55 नदी पट्टे प्रदूषित आहेत. यामध्ये सर्वात प्रदूषित असलेल्या नद्या उल्हास, मिठी, मुळा-मुठा, सावित्री, भीमा, पवना, कान्हा, तापी, गिरणा, कुंडलिका, दारणा, इंद्रायणी, वैनगंगा, चंद्रभागा, मुचकुंडा, वर्धा, कृष्णा, पाताळगंगा, सूर्या, ढोरणा या नदीपात्रांमधील पाणी हे अत्यंत वाईट आहे, असे त्यांनी सांगितले.
बीडमध्ये राखेतून गुंड तयार झाले
बीडला संतोष देशमुख यांना किती वाईट पद्धतीने मारले. पवनचक्क्या, प्रकल्पातील राखेचा पैसा आणि त्यातील खंडणीला विरोध केला, म्हणून देशमुखांची हत्या झाली. मात्र, आपण त्याला जातीचे लेबल लावले. यात राजकीय पक्ष जनतेला गुंतवत आहेत. शेतकरी रोज आत्महत्या करतोय. रोजगार निर्माण होत नाहीत. असंख्य मुले मराठवाडा सोडून पुण्यात येत आहेत; पण त्याकडे लक्ष देऊ नये, म्हणून जातीपातीत गुंतवले जात आहे. जात फक्त निवडणुकीपुरती असते, त्यानंतर काहीच नाही, असेही त्यांनी सांगितले.
योगींनी लाऊडस्पीकर बंद केले
इतर देश धर्मातून बाहेर पडत आहेत आणि आम्ही धर्मांधतेकडे जात आहोत. धर्म प्रत्येकाने घराच्या आत जोपासला पाहिजे. लाऊडस्पीकर बंद करा मी म्हटले, तर माझ्या 17 हजार महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या. आता मुख्यमंत्री म्हणतात, रात्री 10 ते सकाळी 6 बंद करू; मात्र ते त्यावेळेला वाजतच नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये योगींनी पाऊल उचलत लाऊडस्पीकर बंद केले. आपल्याकडे तेच सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले.