सर्वांनी श्रद्धेने अन् एकोप्याने सण साजरे करा !
अमळनेरला शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांचे प्रतिपादन
अमळनेर : सण, उत्सव हे फक्त मौज, मस्तीसाठी साजरे करू नका तर सर्वांनी ते श्रद्धेने आणि एकोप्याने राहून साजरे करा. त्यात आपल्या परिवाराचा सक्रिय सहभाग घ्या. विसर्जन मिरवणुकीत डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनिअर, शिक्षक, वकील, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांना सामील करून घ्या. त्यामुळे परिवारातून सामाजिक जाणीव आणि संस्कृतीची संकल्पना पुढे येईल आणि सर्व सण-उत्सव हे शांततेने साजरे होतील, असे विचार पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी व्यक्त केले. येथील वाणी मंगल कार्यालयात पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.
अमळनेर शहरात १४२ मंडळ आहेत. त्यापैकी टप्प्याटप्प्याने गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. पाच दिवस, सात दिवस, आठ दिवस, नऊ दिवस आणि शेवटी अकराव्या दिवशी १९ गणेश मंडळ गणेश विसर्जन करतील. त्यांच्या विसर्जनाचा मार्ग झामी चौक ते फरशी रोड, बंगाली फाईल ते फरशी रोड असा असेल. त्यानंतर गणेश विसर्जन तापी नदी सावखेडा, मंगळ ग्रह तलाव, बोरी नदी याठिकाणी विसर्जन केले जाईल असे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी सांगितले.
यांनी व्यक्त केले मनोगत
बैठकीत प्रांताधिकारी महादेव खेडकर, माजी आ.स्मिता वाघ, नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, ॲड. व्ही.आर. पाटील, ॲड.शकील काझी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिलोत्तमा पाटील, इमरान खाटीक यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर प्रेक्षकांमधून प्रा. अशोक पवार, विजू मास्तर, पत्रकार धनंजय सोनार, संजय पाटील यांचे सूचना वजा म्हणणे ऐकून घेण्यात आले.
यांनी घेतले परिश्रम
यशस्वीतेसाठी ग्रामीण भागातील नवनियुक्त पोलीस पाटील, सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जयवंत वानखेडे, सर्व सदस्य, व्हॉइस ऑफ मीडियाचेे सर्व सदस्य, अमळनेर शहर पत्रकार संघाचे सर्व सदस्य, पोलीस विभागातील अनिल भुसारे, गोपनीय विभागाचे सिद्धार्थ शिसोदे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अमळनेर गोपनीय विभागाचे डॉ. शरद पाटील, प्रास्ताविक पोलीस निरीक्षक विजय शिंदे तर आभार अमळनेर विभागाचे डीवायएसपी सुनील नांदवळकर यांनी मानले.