DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेत पश्चिम बंगाल आघाडीवर

जळगाव | प्रतिनिधी 

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूल येथे दि. १५ ते २३ सप्टेंबर दरम्यान घेण्यात येत आहे. वरिष्ठ गटाच्या या स्पर्धेत महाराष्ट्र, तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल या राज्याचे संघ सहभागी झाले असुन पश्चिम बंगाल संपूर्ण स्पर्धेत अव्वल स्थानावर आला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)तर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य महिला वरिष्ठ गटाच्या स्पर्धेपुर्वी जळगावात प्रथमच होणाऱ्या यास्पर्धेकडे राष्ट्रीय स्पर्धेची पुर्व तयारी स्पर्धा म्हणून बघितले जात आहे. प्रत्येक सामना हा चुरशीचा होत आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतराज्य वरिष्ठ टि-२० क्रिकेट स्पर्धा-२०२३ च्या दोन दिवसांच्या पावसाच्या विश्रांतीनंतर कालपासून या स्पर्धेला सुरवात झाली. काल (दि.१७) ला महाराष्ट्र विरूद्ध त्रिपूरा व तामिळनाडू विरूद्ध बंगाल यांच्यात १४ षटकांचा सामना खेळविण्यात आला. यात महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली व निर्धारित १४ षटकांत २ गडी बाद ८१ धावा केल्यात. यात ईश्वरी सावकार ४१ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. तिला शिवाली शिंदे १०, तेजल हसबनीस १८, अनुजा पाटील ७ यांनी साथ दिली. त्रिपूरा राज्याच्या संघाकडून हिना ला एकमेव गडी बाद करता आला. प्रतिउत्तरात त्रिपूराचा संघ १४ षटकात केवळ ७३ धावा करू शकला. अशाप्रकारे महाराष्ट्र संघ ८ धावांनी विजयी झाला. या सामन्यात ईश्वरी सावकार ही सामनावीर ठरली.
तामिळनाडू विरूद्ध पश्चिम बंगाल यांच्यात झालेल्या दुसऱ्या सामन्यात तामिळनाडू संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यात अर्बना हिने सर्वाधिक २३ धावांसह निर्धारित १३ षटकांत ५ गडी गमावून ६८ धावा तामिळनाडू ला करता आल्यात. पश्चिम बंगालने हा सामना ११ व्या षटकात ३ गडींच्या मोबदल्यात ७३ धावा करून ७ गडी राखून जिंकला. सामनाविर म्हणून बंगालच्या मिता पॉल (३८ धावा) गौरव करण्यात आला.
आज (दि.१८)ला झालेल्या स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात त्रिपूरा विरूद्ध पश्चिम बंगाल यात त्रिपूरा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतू बंगालच्या संघाने उत्कृष्ठ गोलंदाजी करताना त्रिपूरा संघाला १३ व्या षटकात गारद केले. कमी धावसंख्येचा पाठलाग करताना बंगाल संघाने १० षटकातच केवळ १ गडीच्या मोबदल्यात हे लक्ष्य सहज पार केले. मिता पॉल हिने नाबाद १८ धावांचे योगदान देऊन बंगालचा विजय साकार केला. सामनाविरचा पुरस्कार बंगालची श्रोयोसी हिला ३ गडी बाद केल्याने देण्यात आला.
सामनावीरांना गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या रिसर्च डीन प्रो. गिता धरमपाल यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
दरम्यान आजचा दुसरा व स्पर्धेतील चौथा सामना महाराष्ट्र विरूद्ध तामिळनाडू यांच्यात सुरू असून महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकात सर्वबाद १०० धावा केल्यात. तामिळनाडूने १.२ षटकात बिनबाद ५ धावा केला असून सामना पावसामुळे थांबविण्यात आला.
संपुर्ण स्पर्धेत आतापर्यंत पश्चिम बंगाल ४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर दुसऱ्या क्रमांवर असलेल्या महाराष्ट्र व चौथ्या क्रमांवर असलेल्या तामिळनाडू यांच्या सामना पावसामुळे थांबविण्यात आला होता. त्रिपुराने दोघंही सामने गमाविल्यामुळे त्यांना अजून एकही गुण प्राप्त करता आला नाही.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.