‘पक्षाप्रमाणे इंग्रजी शाळांचे विद्यार्थी फोडा,’ मराठी शाळांची संख्या वाढवण्यासाठी गुलाबरावांचा वादग्रस्त सल्ला
जळगाव : देशभरामध्ये आज शिक्षक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. जवळपास सगळ्याच शाळांमध्ये शिक्षक दिनानिमित्त वेगेवगेळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे, पण अशाच एका कार्यक्रमात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मराठी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या वाढवायची असेल, तर ज्याप्रमाणे पक्षाचे लोक फोडले जातात, तसं इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे विद्यार्थी फोडा, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.
जळगाव जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रमुख अथिती म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त केलं. त्यावेळी ते बोलत होते.
इतकंच नव्हे तर त्यांनी भ्रष्टाचाराबाबतही एक धक्कादायक विधान केले. आज काल कोण करप्ट नाही, आजची सगळी दुनिया करप्ट आहे, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. या देशात एकमेव नॉन करप्ट प्राणी म्हणजे शिक्षक असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी शिक्षकांचा उदो उदो देखील केला. मंत्री गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.