DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

भाविकाला ताटकळत ठेवले; तिरुपती देवस्थानला तब्बल ५० लाखाचा दंड

दिव्यसार्थी ऑनलाईन डेस्क – भारतातील अत्यंत श्रीमंत असलेल्या तिरुपती मंदिर देवस्थानला तब्बल ५० लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.  या दंडाचे कारण म्हणजे भाविकाला तब्बल १४ वर्षे ताटकळत ठेवण्यात आले. भाविकाने ग्राहक न्यायालयात धाव घेतली आणि त्याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली. तसेच, देवस्थानला तब्बल ५० लाख रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला आहे. त्याची सध्या देशभरात मोठी चर्चा होत आहे. तिरुपती देवस्थानाच्या सेवेतील कमतरतेच्या विरोधात एखाद्या भाविकाने ग्राहक न्यायालयात खटला दाखल केल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे याबाबत धार्मिक क्षेत्रात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

भारतातील तीर्थक्षेत्रांमध्ये तिरुपती हे प्रख्यात आहे. देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान म्हणूनही ते ओळखले जाते. आंध्रप्रदेश राज्याच्या दक्षिण टोकावरील चित्तूर जिल्ह्यात तिरुपती हे शहर आहे. याच शहराच्या जवळ असलेल्या डोंगरावर तिरुपची बालाजीचे हे मंदिर आहे. याच डोंगराला ‘तिरुमला’ असे म्हणतात. तिरुमला डोंगर रांगेत एकूण ७ डोंगर आहेत. त्याला सात फण्यांचा आदिशेष असे म्हणतात. हे देवस्थान अगदी शेवटच्या डोंगरावर वसले आहे. या परिसराला सप्तगिरी असेही म्हणतात. हा डोंगर हा लाल दगडाचा आहे.

 

भगवान तिरुपतीच्या परिसरातील देवळाचा इतिहास देखील ३०० वर्ष जुना आहे. सध्या या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी आहे. भगवान व्यंकटेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांना ४८ तासांपेक्षा जास्त वेळ थांबावे लागते, यावरून गर्दीचा अंदाज लावता येतो. मंदिर व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी एक लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. काल रविवारीही एवढीच यात्रेकरूंची संख्या राहिली आहे. मात्र आता तिरुपती मंदिर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. भक्ताला सेवा देण्यासाठी विलंब तिरुपती देवस्थानला भोवला आहे. वस्त्रालंकार सेवा देण्यासाठी भाविकाला तब्बल १४ वर्षे वाट पाहायला लावण्यात आली. त्यापोटी तिरुपती देवस्थान ५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तामिळनाडूच्या सलेम इथल्या ग्राहक न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार भक्ताला वस्त्रलंकार सेवेसाठी नवीन तारीख देण्यात यावी किंवा वर्षभरात ५० लाख रुपयांची भरपाई द्यावी. एका भक्ताने तिरुपती देवस्थानाविरोधात ग्राहक न्यायालयात खटला दाखल केला होता. असा खटला दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भक्त के.आर.हरी भास्कर यांनी वस्त्रालंकार सेवेसाठी २००६ मध्ये बुकींग केले होते. कोरोनाकाळात तिरुपती मंदिर ८० दिवसांसाठी बंद होते. त्यामुळे मंदिरातील वस्त्रालंकारासह सर्व सेवा बंद होत्या. तिरुमाला तिरुपती देवस्थानाने भक्त हरी भास्कर यांना अधिकृत निवेदन पाठवत विचारणा केली होती की त्यांना व्हीआयपी ब्रेक दर्शनासाठी नवीन स्लॉट हवा आहे की परतावा. यावर भास्कर यांनी देवस्थानाला वस्त्रलंकार सेवेची कोणतीही तारीख देण्याची विनंती केली होती. मात्र वस्त्रालंकार सेवेसाठी नवीन तारीख देता येणार नसल्याचे देवस्थानने सांगितले आणि परतावा घेण्यास सांगितले. यानंतर भक्त के.आर.हरी भास्कर यांनी ग्राहक न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायलयाने भक्ताच्या बाजूने निकाल दिला आहे.

२००६ मध्ये भास्कर यांनी भरलेल्या बुकींग रकमेच्या वार्षिक २४ टक्के व्याजासह देण्याचे आदेश न्यायालयाने तिरुपती देवस्थानाला दिले आहेत. भास्कर यांनी १२ हजार २५० रुपये बुकिंग रक्कम भरली होती. नवीन तारीख द्या अन्यथा बुकींग रकमेच्या व्याजासह ५० लाख नुकसानभरपाई द्या, असे आदेश ग्राहक न्यायालयाने दिले आहेत.

तिरुमला टेकडीवर एक लाखाहून अधिक प्रवासी भाविक असून ते रांगेत उभे राहू शकत नाहीत. वार्षिक ब्रह्मोत्सव, वैकुंठ एकादशी गरुड सेवेच्या उत्सवाच्या प्रसंगी गर्दीपेक्षा सध्याच्या यात्रेकरूंची गर्दी जास्त असते. मंदिर प्रशासनच्या अंदाजानुसार, सध्या मंदिरात दर तासाला ४५०० भाविक दर्शन घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे दर्शनासाठी नागरिकांना दोन दिवस लागत आहेत. गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या काळात लादलेले सर्व निर्बंध हटवल्यामुळे यात्रेकरूंच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.