पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील राष्ट्रपती पदकाने सन्मानित
जळगाव | प्रतिनिधी
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे वाचक तथा पोलीस उपनिरीक्षक सुनील शामकांत पाटील यांना राष्ट्रपती पदकाने नुकतेच मुंबईत सन्मानित करण्यात आले.
राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. पाटील यांनी अनेक क्लिष्ट गुन्ह्यांच्या तपासात तांत्रिक, भौतिक व इतर वस्तूनिष्ट पुरावे संकलित करुन न्यायालयात दोषारोपपत्र पाठविले आहे. त्यातून अनेकांना जन्मठेपेसारख्या शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. त्याची दखल घेऊन त्यांना १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहिर झाले होते. त्याचे नुकतेच मुंबईत वितरण करण्यात आले.
सुनिल पाटील यांनी याचे श्रेय वरिष्ठांना तसेच सतत मार्गदर्शन करणारे वडिल सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. शामकांत पाटील यांना दिले आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्यासह मंत्री व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. सुनिल पाटील यांचे या सन्मानाबद्दल पोलिस दलातील वरिष्ठ, सहकारी, नातेवाईक, मित्रमंडळी तसेच असोदा गावातील ग्रामस्थांतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.