DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मातोश्री वृद्धाश्रमात रंगली “जी. एच. रायसोनीच्या विध्यार्थ्याची” दिवाळी

महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे वृद्धाश्रमात फराळ व भेटवस्तू वाटप करत साजरा झाला दीपोस्तव सोहळा

जळगाव :  कुणी खेळत होते, कुणी गाण्यांच्या ठेक्यावर बेभान होऊन नाचत होते, कुणी हे सगळे पाहून मनमुराद हसत होते तर कुणी भरवलेला घास मनापासून खात उपस्थितांचे कौतुक करत होते, आयुष्यात वाट्याला आलेले दु:खाचे प्रसंग विसरून गप्पा मारता मारता हा आनंद सोहळा रंगला होता शहरापासून काही अंतरावर सावखेडा या नयनरम्य परिसरातील मातोश्री वृद्धाश्रमात. तेथील सर्व ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर हास्याचे कारंजे फुलवले जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या युवकांनी. आजी-आजोबांना सगळे दु:ख विसरून हसायला, बागडायला लावून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याची ‘रायसोनी’च्या शिलेदारांची ही काही पहिली वेळ नव्हती. मागील काळात या युवकानी मकरसंक्राती, मैत्रीदिनाच्या पूर्वसंध्येला उडान या संस्थेत मतीमंद मुलांसोबत ‘गप्पा, गोष्टी आणि बरंच काही’ या उपक्रमाचे आयोजन केले होते.

एरव्ही दिवाळीची सुटी म्हटले, की फटाके फोडणे, पिक्चरला जाणे, हॉटेलात जाऊन पोटपूजा करून धमाल करणे हा कॉलेजकुमारांचा आवडता छंद; पण जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांचे “विद्यार्थी कल्याण विभाग” वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना आनंद देण्यासाठी धडपडतेय. महाविध्यालयातील विध्यार्थ्याना दिवाळीच्या सुट्टीमधील एक दिवस वृद्धाश्रमाला भेट देण्याची कल्पना सुचली. सर्वांना ती आवडली. आणि त्यानुसार नियोजन करत या ‘यंग ब्रिगेड’चा दिवस सुरू झाला तो आजी-आजोबांच्या थरथरत्या हातांना आधार देऊन. सर्वप्रथम त्यांनी सर्व ज्येष्ठांना हॉलमध्ये एकत्र केले आणि मनोरंजक खेळ सुरू केले. बादलीमध्ये चेंडू टाकणे, चिठ्ठीद्वारे चित्रपटातील डायलॉग व जुनी गाणी म्हणणे अशा स्पर्धांमध्ये तेथील वृद्धांनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी महाविद्यालयाच्या म्युझिक क्लबच्या विद्यार्थ्यांनी अनेक दिपावलीचे गीते सादर करून वृद्धांना गाण्याच्या ठेक्यांवर नाचायला लावले तसेच यावेळी वृद्धाश्रमातील वृद्धाना फराळ व भेटवस्तू वाटप करण्यात आले. जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या आनंदसोहळ्यात यश लड्डा, श्रेयल बडगुजर, सिद्धेश्वर सावडेकर, यश पाटील, अक्षय भोळे, मानसी जगताप, समृद्धी सोनार, विवेक पाटील, मोहित पाटील, प्राजक्ता चौधरी, श्रुती बडगुजर, चेतन बाविस्कर, महेश देसले व प्रा. भाग्यश्री कोलते, प्रा. वसीम पटेल सहभागी झाले होते. सदर उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, डीन प्रा.डॉ. प्रणव चरखा यांनी कौतुक केले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.