पितृछत्र हरपलेल्या दुर्गाच्या लग्नाची वरात येत नाही दारी…तेवढ्यातच हजार वऱ्हाडींच्या पंगतीचा बाजार पोचला घरी
आमदार मंगेश चव्हाण व सौ.प्रतिभा चव्हाण यांच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक
जळगाव : डोळ्यादेखत मुलीचे हात पिवळे होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पित्याने लग्न महिन्यावर असतानाच आजारपणात डोळे मिटले. होती नव्हती तेवढी जमापुंजी त्यांच्या आजारपणातच खर्च झाल्याने आता मुलीच्या लग्नाचा खर्च भागविणार तरी कसा, या विवंचनेत संपूर्ण परिवार हातावर हात धरून बसला. आडगाव (ता.चाळीसगाव) येथील एका गरीब कुटुंबावर गुदरलेला सदरचा बाका प्रसंग शिवनेरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्या कानी पडला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सदर कुटुंबाला आधार देण्याचा निर्णय घेतला. पितृछत्र हरपलेल्या दुर्गाच्या लग्नाची वरात दारी येत नाही तोपर्यंत एक हजार वऱ्हाडींच्या पंगतीसाठी लागणारा किराणा सामान त्यांच्या घरी पाठवूनही दिला.
मुलीचे लग्न तोंडावर असताना बाडकष्ट करून संसाराचा गाडा हाकणारे आडगावचे रहिवासी बापू रामदास हांबरे (गोपाळ) यांचे काही दिवसांपूर्वीच आजारपणामुळे अकाली निधन झाले. पत्नी, तीन मुली व एक लहान मुलगा असा परिवार असणाऱ्या बापू यांची लहान मुलगी कु.दुर्गा हिचे लग्न येत्या २ मे रोजी ठरले असून, लग्न महिन्यावर आलेले असताना दुःखाचा डोंगर त्यांच्या कुटुंबावर कोसळला. बापूंच्या उपचारासाठी दवाखान्याचा मोठा खर्च करावा लागल्याने गोपाळ कुटुंबाच्या पुढे दुर्गाचे ठरलेले लग्नं कसे पार पाडावे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला. गोपाळ कुटुंबाची ही दुःखद कथा चाळीसगावातील शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभा मंगेशदादा चव्हाण यांना कळाली. त्यानंतर त्यांनी सदर कुटुंबाला आधार देण्याचा निर्णय घेतला. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने कु.दुर्गाच्या लग्नातील एक हजार वऱ्हाडी लोकांच्या पंगतीसाठी लागणारा जेवणाचा किराणा बाजार घरपोच सुपूर्द देखील करण्यात आला. पतीच्या निधनाचे दुःख व तोंडावर आलेले मुलीचे लग्न या विवंचनेत असलेल्या त्या मायमाऊलीला शिवनेरी फाऊंडेशच्या मदतीमुळे मोठा आधार मिळाला आहे.
एका गरीब शेतमजूर कुटुंबाच्या मदतीला संकटकाळी धाऊन गेल्याने आमदार मंगेशदादा चव्हाण व सौ.प्रतिभाताई चव्हाण यांच्या दातृत्वाचे मोठे कौतुक सर्वत्र होत आहे. चव्हाण दाम्पत्य नेहमीच तालुक्यातील संकटात सापडलेल्या तसेच अडल्या नडल्या निराधारांच्या पाठीमागे उभे राहते. मात्र विरोधकांना त्यांच्या कामाची, दातृत्वाची बरोबरी करता येत नसल्याने ते नेहमीच मंगेशदादा व प्रतिभाताई चव्हाण यांच्या कार्यावर जळतात, असे सर्व सामान्यांमधून बोलले जात आहे.